आसामच्या कोक्राझार येथे अन्सारूल्ला बांगला टीम (एबीटी) या दहशतवादी संघटनेच्या 2 जिहादी दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. यासंदर्भात विशेष पोलिस महासंचालक हरमीत सिंग यांनी सांगितले की, एसटीएफने मंगळवारी रात्री नामपारा भागात कोक्राझार पोलिसांच्या सहकार्याने ही कारवाई केली आहे. ऑपरेशन प्रगती अंतर्गत ही अटक करण्यात आली आहे. आसाम पोलिसांनी यापूर्वी 17 डिसेंबरच्या मध्यरात्री एका बांगलादेशीसह 8 संशयित दहशतवाद्यांना अटक केली होती. हे जिहादी एक मोठे दहशतवादी नेटवर्क तयार करण्याची योजना आखत होते, परंतु आमच्या यशस्वी ऑपरेशननंतर त्यांचा पहिला प्रयत्न फसला. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आम्ही अनेक राज्य आणि केंद्रीय संस्थांसोबत काम करत आहोत.येत्या काही दिवसांत अधिक माहिती समोर येईल असे सिंग यांनी सांगितले आहे. .
अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून एसटीएफच्या पथकाने एके-47 सारख्या हाताने बनवलेल्या 4 रायफल जप्त केल्या आहेत. यासोबतच मोठ्या प्रमाणात दारूगोळाही जप्त करण्यात आला आहे. आयईडी सोबत हाताने तयार केलेला ग्रेनेड, डिटोनेटरचे सर्किट, 14 इलेक्ट्रॉनिक स्विच, आयईडी बनवण्यासाठी वापरलेले 3 लोखंडी केस आणि जास्तीत जास्त नुकसान करण्यासाठी 20 लोखंडी तुकडे आणि प्लेट्स देखील जप्त करण्यात आल्या आहेत. याशिवाय फटाक्यांमध्ये वापरण्यात येणाऱ्या स्फोटकांसह मोठ्या प्रमाणात स्विचेस, वायर्स आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.
STF आसामने या सर्व दहशतवाद्यांवर विविध कलमांखाली एफआयआर दाखल केला आहे. STF प्रमुख डॉ. पार्थ सारथी महंता यांच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली “प्रगत” नावाचे ऑपरेशन सुरू करण्यात आले. जिहादी घटकांची ओळख पटवण्यासाठी त्यांना पकडण्यासाठी आणि १७-१८ डिसेंबरच्या मध्यरात्री केरळ, पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये एकाच वेळी शोध आणि जप्ती मोहीम राबवण्यासाठी पथके देशाच्या विविध भागात रवाना करण्यात आली. त्यातून आठ जणांना अटक करण्यात आली आहे.