सोशल मीडियावर चुकीची पोस्ट फॉरवर्ड करणाऱ्यांवर होणार कारवाई
आजच्या डिजिटल जगात सोशल मिडियाने माणसाचं सबंध जीवन व्यापून टाकलं आहे. आता या नव्या तंत्रज्ञानाचे जसे फायदे आहेत तसे काही तोटेही आहेत. दिवसभरात जगभरातील लोक यावर विविध प्रकारच्या पोस्ट टाकत असतात. पण आपण टाकलेली पोस्ट ही खरी आहे की खोटी, हे फारसं कोणी पडताळून पाहत नाही. मात्र, तिचा प्रसार इतक्या वेगाने होतो की, विचार करायलाही वेळ नसतो. पण एखाद्या चुकीच्या पोस्टने एखाद्याचं आयुष्य देखील उध्वस्त होऊ शकतं. काही व्यक्ती इतरांना हानी पोहोचवण्यासाठी हेतूपुरस्सर दिशाभूल करणारी किंवा बदनामीकारक सामग्री फॉरवर्ड करत असतात ज्याचे अनेकदा गंभीर परिणाम दिसून येतात. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर खोटी माहिती फॉरवर्ड करणाऱ्यांविरुद्ध एक मोहिम सुरु केली आहे. ज्याद्वारे हेतूपुरस्सर असं काम करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यास मदत होणार आहे. पण ही मोहिम नेमकी काय आहे आणि आता सोशल मिडिया वापरताना कोणती काळजी घेणं गरजेचं आहे ते आपण जाणून घेणार आहोत.
खरंतर सोशल मिडिया जगभरातील लोकांपर्यंत पोहोचण्याचं एक प्रभावी माध्यम आहे. पण यावर आता अनेक चुकीच्या पोस्ट वायरल होताना दिसत आहेत ज्या वरकरणी पाहता खऱ्या वाटू शकतात पण नंतर त्याची सत्यता समोर आल्यानंतर पोस्ट करणाऱ्यांना स्वतःची चूक लक्षात येते. पण दूसरीकडं गेल्या काही दिवसांपासून काही विकृत प्रवृत्ती सोशल मिडियावर सामाजिक सलोखा बिघडेल, किंवा लोकांच्या धार्मिक भावना दुखावतील अशा पोस्ट वारंवार शेअर करताना दिसत आहेत. शिवाय जाणून बुजून एखाद्या राजकीय नेत्याच्या फोटोशी AI च्या माध्यमातून छेडछाड केली जात आहे. आणि व्हाट्सऍप-फेसबुक-ट्विटर अर्थात एक्स सारख्या माध्यमांतून काही क्षणांत तो फोटो सर्वत्र पसरवला जात आहे. हे कमी का काय म्हणून आता राजकीय नेत्यांच्या ऑडिओ किंवा व्हिडिओ क्लिप्स देखील अर्धवट एडीट करुन वायरल केल्या जात आहेत. काही बहाद्दरांनी तर चक्कं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधानसभेतील भाषण एडिट करुन त्यांची अर्धवटच क्लिप वायरल करीत फडणवीस हे संविधान विरोधी असल्याचा भ्रम पसरवण्याचा प्रयत्न केला. फक्त फडणवीसच नाही तर इतरही अनेक नेत्यांच्या भाषणाचे अर्धवट भाग वायरल करण्याचे प्रकार अलिकडं समाज माध्यमावर वाढताना दिसत आहेत.
दरम्यान फडणवीस यांच्या भाषणाचा अर्धवट व्हिडिओ वायरल करणाऱ्यांचा सायबर पोलिसांनी तात्काळ शोध घेऊन 12 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे या कारवाईच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी गुन्हेगारांना दणकाच दिला आहे. शिवाय आता या प्रवृत्तीला वेळीच रोखण्यासाठी फडणवीस यांनी आणखी एक महत्वाचं पाऊल उचलले आहे. चुकीची पोस्ट किंवा चुकीची चित्रफीत तयार करून समाज माध्यमावर प्रसारित करणे आणि ती पोस्ट किंवा चित्रफित फॉरवर्ड करणे हे गुन्हेगारी कृत्यं म्हणून आता समजलं जाणार आहे. त्यामुळे त्यांच्यावर सायबर गुन्हा दाखल केला जाऊ शकतो असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. जी व्यक्ती अशी सामग्री सोशल मिडियावर प्रसारित करेल त्याचे शंभर टक्के डिजिटल फुटप्रिंट आम्हाला शोधता येतात असा इशाराही त्यांनी दिला आहे. बुधवारी नागपूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदे दरम्यान ते बोलत होते.
वास्तविक सोशल मीडिया वर विचारांची देवाणघेवाण होते पण हे विचार नेहेमीच चांगलेच असतील असे नाही. अनेकदा सोशल मीडिया वर एखाद्या विशिष्ट जाती-धर्मा विरोधात किंवा काही आदरणीय व्यक्तिबद्दल हेतूपुरस्सर वाईट माहिती पसरवली जाते. महापुरुषांच्या प्रतिमांची छेडछाड केल्याचे फोटो देखील समाज माध्यमावर अनेकदा फिरताना दिसून येतात. पण अशा चूकीच्या पोस्टमुळे जातीय दंगली होऊ शकतात. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. सोशल मीडिया हे ओपन प्लॅटफॉर्म आहे. कोणीही त्यावर पोस्ट करू शकतो किंवा प्रतिक्रिया देऊ शकतो. पण पोस्ट टाकताना किंवा प्रतिक्रिया देताना जागरूक असणं गरजेचं आहे. घटनेने सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं असलं, तरी त्या स्वातंत्र्यामुळे दुसऱ्या कोणाच्या अधिकारांवर गदा येत असेल, तर ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य ठरत नाही. म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करताना काळजीपूर्वक केला पाहिजे.
एकुणच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकप्रकारे चुकीची माहिती पसरवणाऱ्यांना सावध केलं आहे. तसेच अशा कृत्यापासून दूर राहण्याची विनंती देखील केली आहे. मात्र तरीही अशी कृत्ये घडत असतील तर यामध्ये जे जे दोषी आढळतील. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.