दिल्ली विधानसभा निवडणुकीबाबत राजकीय पेच अधिकच वाढताना दिसत आहे. दिल्लीत काँग्रेस आणि आम आदमी पक्षात उघडपणे संघर्ष होताना दिसत आहे.दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वीच विरोधी पक्षांनी तयार केलेल्या ‘इंडी’ आघाडीमध्ये प्रचंड मतभेद होण्यास सुरूवात झाली आहे. आम आदमी पार्टी ने इंडिया आघाडीतून काँग्रेसला बाहेर काढा अशी मागणी केली आहे. यासाठी इंडी आघाडीतील इतर पक्षांशी आपण बातचीत करणार असल्याचे आपचे प्रमुख नेते अरविंद केजरीवाल यांनी म्हंटले आहे.
काँग्रेस भाजपच्या सहकार्याने काम करत असल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. याप्रकरणी आज दिल्लीचे मुख्यमंत्री आतिशी यांनी राज्यसभा खासदार संजय सिंह यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली आहे. आम आदमी पक्षातील नेते काँग्रेसवर प्रचंड नाराज असल्याचे सांगितले जात आहे. काँग्रेसचे नेते सातत्याने आम आदमी पक्ष आणि त्यांच्या नेत्यांबद्दल भडक विधाने करत आहेत. यामुळे ही नाराजी असल्याचे सांगितले जात आहे. यामुळेच विरोधकांची पुन्हा एकदा नवी मोट बांधली जावी आणि त्यात काँग्रेसला स्थान नसावे अशी आम आदमी पक्षाची मागणी आहे.
.
दिल्ली विधानसभा निवडणुकांपूर्वी आपकडून जाहीर करण्यात आलेल्या मोफत योजनांवरून राजकारण तापायला लागले आहे.काल दिल्ली युवक काँग्रेसचे अध्यक्ष अक्षय लाक्रा यांनी आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात पार्लमेंट स्ट्रीट पोलिस स्टेशनमध्ये ‘आप’च्या महिला सन्मान योजना आणि संजीवनी योजनेबाबत तक्रार दाखल केली आहे. केजरीवालांवर आरोप करताना ते म्हणाले आहेत की, ‘आप’च्या योजना केवळ जनतेची दिशाभूल करत आहेत. ऑनलाइन नोंदणीद्वारे केवळ संवेदनशील माहिती संकलित केली जात आहे.
तर आज (२६ डिसेंबर) रोजी काँग्रेस नेते संजीव दीक्षित यांनी दिल्लीचे नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांच्याशी विशेष भेट घेतली आहे. त्या बैठकीत संजीव दीक्षित यांनी आम आदमी पार्टीने जाहीर केलेल्या महिला सन्मान योजना आणि संजीवनी योजनेनंतर त्यांच्या नोंदणीबाबत एलजीकडे तक्रार करत आम आदमी पार्टी खोटे आणि दिशाभूल राजकारण करत आहे.असा आरोप आप आणि अर्थातच अरविंद केजरीवाल यांच्यावर केला आहे.