या वेळी राजकीय पक्षांच्या बँक खात्यांमध्ये पूर्वीपेक्षा जास्त देणग्या आल्या आहेत. या बाबतीत भाजपने पुन्हा बाजी मारली आहे. जगातील सर्वात मोठा पक्ष भाजपला 2023-24 मध्ये 2,244 कोटी रुपये देणगी म्हणून मिळाले आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये भरभरून मत मिळवल्या नंतर भाजपला आता मोठ्या प्रमाणात देणग्या मिळत असल्याचे समोर आले आहे. समोर आलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, २०२३- २०२४ या वर्षात भाजपला २,२४४ कोटी रूपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. व्यक्ती, ट्रस्ट आणि कॉर्पोरेट हाऊसेस यांच्याकडून ही देणगी मिळाली आहे. यावेळी भाजपला गेल्या वर्षीच्या तुलनेत 3 पट जास्त देणग्या मिळाल्या आहेत.
तर काँग्रेस पक्षाला मिळणाऱ्या देणग्यांमध्येही वाढ झाली असून काँग्रेसला 2023-24 मध्ये 289 कोटी रुपये मिळाले आहेत. गेल्या वर्षी काँग्रेसला केवळ 79.9 कोटी रुपये मिळाले होते. मात्र या वर्षी भाजपला काँग्रेसपेक्षा ७७६.८२ टक्के अधिक देणग्या मिळाल्या आहेत. भाजप आणि काँग्रेसने दिलेल्या देणग्यांच्या खात्यांमध्ये इलेक्टोरल बाँड्स समाविष्ट नाहीत. या दोन्ही राष्ट्रीय पक्षांना प्रुडंट इलेक्टोरल ट्रस्टकडून सर्वाधिक देणग्या मिळाल्या आहेत. या ट्रस्टच्या माध्यमातून भाजपला 723 कोटी रुपये आणि काँग्रेसला 156 कोटी रुपये दिले आहेत.
देणगीच्या बाबतीत तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या पक्ष बीआरएसने काँग्रेसला मागे टाकले आहे. बीआरएसला 580 कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे. भाजपनंतर, देणगी मिळवणारा बीआरएस हा दुसरा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.
या वर्षी फेब्रुवारीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने इलेक्टोरल बाँड योजना रद्द केली होती. तेव्हापासून, राजकीय पक्षांसाठी निधीचा सर्वात मोठा स्त्रोत थेट पैसा किंवा इलेक्टोरल ट्रस्टद्वारे मिळालेला पैसा असा असल्याचे समोर आले आहे.