बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर आता धाराशिवमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यात सरपंच असणाऱ्या नामदेव निकम यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. मात्र, सरपंच नामदेव निकम यांचा जीव थोडक्यात बचावला आहे. तुळजापूरमधील बारुळ गावानजीक गुरुवारी रात्री हा प्रकार घडला आहे.पवन चक्कीच्या वादामधून तुळजापूर मध्ये सरपंचावरती हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.सरपंचाच्या गाडीवरती हल्ला करण्यात आला आणि गाडीवरती पेट्रोल टाकण्यात आले. हे पेट्रोल टाकून त्यानंतर गाडी जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि या गाडीचे दृश्य सुद्धा आता समोर आली आहेत
मिळालेल्या माहितीनुसार,नामदेव निकम हे मेसाई जवळगा गावचे सरपंच आहेत.नामदेव निकम हे बारुळ गावातून आपल्या मेसाई जवळगा गावाच्या दिशेने जात असताना काही गुंडांनी त्यांच्यावर हल्ला केला आहे.नामदेव निकम हे गुरुवारी रात्री आपल्या चारचाकी वाहनाने जात होते. त्यावेळी काही गुंडांनी नामदेव निकम यांच्या गाडीवर अंडी फेकत त्यांची गाडी अडवली. त्यानंतर त्यांच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या. यानंतर गुंडांनी निकम यांच्या गाडीवर पेट्रोल ओतून गाडी जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, सरपंच नामदेव निकम यांचा जीव थोडक्यात बचावला. या हल्ल्यात सरपंच नामदेव निकम आणि आणखी एक व्यक्ती जखमी झाले आहेत.
या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी येत पंचनामा केला आहे. प्राथमिक तपासात हा हल्ला पवनचक्कीच्या वादातून हल्ला झाला असल्याची माहिती समोर आली. मात्र या घटनेमुळे धाराशिव जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून या भागात गुंड दहशत माजवत असल्याच्या बातम्या सातत्याने समोर येत आहेत. आता याठिकाणी थेट सरपंचाला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळे आता याप्रकरणात पोलीस काय कारवाई करतात आणि गुन्हेगारांना कधी पकडणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे असे सुरु राहिल्यास आम्ही काम कसे करणार? मला पोलिसांनी सुरक्षा दिल्यास बरे होईल, असे नामदेव निकम यांनी सांगितले आहे.