माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना आज सकाळपासून लुटियन्स दिल्लीतील मोतीलाल नेहरू मार्गावरील बंगला क्रमांक-3 येथे श्रद्धांजली वाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली आहे दरम्यान, लष्करी सन्मानासह त्यांचे पार्थिव राष्ट्रध्वजात म्हणजेच तिरंग्यात लपेटण्यात आले आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, सोनिया गांधी आणि केरळमधील वायनाड येथील खासदार प्रियांका गांधी वड्रा यांनी दिवंगत नेत्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांच्या अधिकृत निवासस्थान 3, मोतीलाल नेहरू मार्गावर पोहोचले होते. तत्पूर्वी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ,पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी माजी पंतप्रधान सिंग यांना अंत्यदर्शन घेत श्रद्धांजली वाहिली.
सिंग यांचे काल रात्री ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) येथे निधन झाले. त्यांचे पार्थिव त्यांच्या शासकीय निवासस्थान 3, मोतीलाल नेहरू मार्ग येथे अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. 3 मोतीलाल नेहरू मार्गाबाहेर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. तर केंद्र सरकारने देशात सात दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर केला आहे.
सिंग यांच्या पश्चात पत्नी गुरशरण कौर आणि तीन मुली उपिंदर सिंग, दमन सिंग आणि अमृत सिंग असा परिवार आहे. उपिंदर एक इतिहासकार, दमन एक लेखक आणि अमृत हा मानवाधिकार वकील आहे. अमृत अमेरिकेत आहे. ती आज रात्री अमेरिकेतून नवी दिल्लीला पोहोचण्याची शक्यता आहे. त्यानंतर मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर उद्या शनिवारी दिल्लीमध्ये पूर्ण सरकारी सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.