मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार, लष्कर-ए-तोयबाचा सहसंस्थापक हाफिज अब्दुल रहमान मक्की याचा पाकिस्तानमध्ये मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.आज त्याला हृदयविकाराचा झटका आला, त्यामुळे त्याचे निधन झाले असे सांगण्यात येत आहे. मक्की हा गेल्या काही दिवसांपासून आजारी होता आणि त्याच्यावर लाहोरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
मक्कीचे जमात-उद-दावा कमांडर हाफिज सईदशी जवळचे संबंध होते आणि तो त्याचा मेहुणा होता. हाफिज सदाईने अब्दुल रहमान मक्की याला जमात उद दावाचा उपप्रमुख बनवले होते. जमात उद दावानेही मक्कीच्या मृत्यूची पुष्टी करणारे निवेदन जारी केले आहे. मक्की गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याचे दहशतवादी संघटनेचे म्हणणे आहे. त्याचा मधुमेह वाढल्याने त्याला उपचारासाठी लाहोरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याच दरम्यान त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि मृत्यू झाला.
अब्दुल रहमान मक्की हा लष्कर-ए-तैयबाच्या टेरर फंडिंगवर लक्ष ठेवायचा.शिवाय लष्कर-ए-तोयबाच्या अनेक कारस्थानांचे काम तो बघत होता.शिवाय लष्कर-ए-तोयबासाठी फंड मिळवण्याचे काम करण्यामध्ये मक्कीची भूमिका होती. दहशतवादी संघटनेमध्ये तरुणांची भरती करायची, त्यांना कट्टरपंथी बनवायचे हे काम त्याच्याकडे होते. अमेरिकेने मक्कीला जागतिक दहशतवादी घोषित केले होते. तर तो भारतालाही हवा होता.