बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली होती.जुन्या वादातून अपहरण करून त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या घटनेतील दोषी अजून फरार आहेत. या घटनेला 18 दिवस झाले तरी आरोपींना अटक झालेली नसून त्यावरून राज्यभरातील वातावरण अतिशय तापलेले आहे.या हत्याप्रकरणावरुन राज्यातील वातावरण चांगलेच तापले असून सर्वच स्तरातून या घटनेचा निषेध केला जात आहे. आता या घटनेविरोधात उद्या (28 डिसेंबर) बीडमध्ये सर्वपक्षीय नेत्यांच्या वतीने मूक मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आयोजित या मोर्चाचे संपूर्ण बीड शहरात बॅनर लागले असून ‘संतोष देशमुख यांची हत्या म्हणजे माणुसकीची हत्या‘ असे या बॅनर्सवर लिहिण्यात आले आहे.
लातूरच्या रेणापूर इथ संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा करावी या मागणीसाठी आज सकल मराठा समाजाकडून तहसील कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आला होता.सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख आणि मुलगा विराज देशमुख हे दोघेही मोर्चात सहभागी झाले होते.”आपण मोर्चामध्ये सहभागी झालात..यापुढे ही आपली साथ आम्हाला कायम राहू द्या. आमच्या वडिलांना न्याय मिळालाच पाहिजे तसेच आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळालीच पाहिजेत. त्यासाठी हे आंदोलन सुरूच ठेवुयात,मात्र यापुढे होणारे आंदोलन, मोर्चे शांततेच्या मार्गाने व्हावेत” अशी भावना यावेळी वैभवी देशमुख यांनी जमलेल्या जनसमुदायासमोर व्यक्त केली आहे.
बारा दिवसांपूर्वी हा तपास सीआयडीकडे सोपविण्यात आला होता. बीडचे एसपी नवनीत कावत यांच्या सोबत पोलीस अधिक्षक कार्यालयात सीआयडीच्या विशेष पोलीस महासंचालकांची बैठक सुरु आहे. या बैठकीत संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना अटक करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाणार आहे. या हत्येप्रकरणात राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या वाल्मिकी कराड यांच्याकडे संशयाची सुई असल्याने त्यांना या प्रकरणात अटक होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.