हवामान बदलामुळे 2024 मध्ये जगभरातील उन्हाळ्याच्या दिवसांच्या संख्येत 41 दिवसांची वाढ झाली. यासंदर्भात नवीन संशोधन अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. आतापर्यंतचे सर्वाधिक उष्ण वर्ष म्हणून 2024 चा उल्लेख करावा लागेल असे वर्ल्ड वेदर ॲट्रिब्युशनचे प्रमुख डॉ. फ्रेडरिक ओटो यांनी म्हंटले आहे.
डॉ. फ्रेडरिक ओटो यांनी सांगितले की जगभरातील लाखो लोकांना उष्णता आणि संबंधित आजारांमुळे विस्थापित व्हावे लागले. वातावरणातील बदलामुळे पूर, वादळ आणि दुष्काळामुळेही लोकांना समस्यांना सामोरे जावे लागले. या काळात 3700 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. जोपर्यंत जग जीवाश्म इंधन जाळत राहील, तोपर्यंत हवामान बदलाची समस्या वाढत जाईल असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे. दरवर्षी तापमानात 2 अंश सेल्सिअसने वाढ होत राहिल्यास 2040 पर्यंत परिस्थिती गंभीर होऊ शकते, असेही संशोधनात सांगण्यात आले.
देशातील अनेक शहरांना याचा फटका बसला. जून ते ऑगस्ट २०२४ या काळात देशातील अनेक शहरांत तापमानवाढ जाणवली. यात तिरुअनंतपुरम, वसई-विरार, कावरत्ती, ठाणे, मुंबई आणि पोर्ट ब्लेअर यांना सर्वाधिक झळा बसल्या. २०२४ मध्ये या शहरांमध्ये किमान ७० दिवस तापमान नेहमीपेक्षा अधिक असल्याचे आढळून आले.
काही ठिकाणी वातावरणातील बदलामुळे दीडशे किंवा त्याहून अधिक दिवस उष्मा राहिला. हवामान बदलामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी लवकरच पावले उचलण्याची गरज आहे. जगभरात सुमारे 13 महिने उष्णतेची लाट कायम होती.आफ्रिकन देश सुदान, नायजेरिया आणि कॅमेरूनमध्ये तीव्र उष्णतेमुळे उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे 2 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. तर तीव्र उष्णतेने उत्तर कॅलिफोर्निया आणि डेथ व्हॅलीमध्येही कहर केला. दक्षिण आणि दक्षिण-पूर्व आशियाई देशांमध्ये तीव्र उष्णतेमुळे शाळा बंद ठेवायला लागल्या.
संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण कार्यक्रमाने असा इशारा दिला आहे की जर कोणतीही कारवाई केली नाही तर हवामान बदलामुळे घटनांमध्ये आणखी वाढ होऊ शकते, कारण या वर्षी जीवाश्म इंधन जाळल्यामुळे गेल्या वर्षीपेक्षा जास्त कार्बन डाय ऑक्साईड वातावरणात पाठविला गेला आहे, ज्यामुळे मृत्यूमध्ये वाढ झाली असून पृथ्वी खूप गरम झाली आहे.असे निरीक्षण त्यांनी नोंदवले आहे.
क्लायमेट सेंट्रलच्या क्लायमेट सायन्सच्या उपाध्यक्ष क्रिस्टीना डहल यांच्या मते, जगातील कमी लोकसंख्या असलेल्या आणि कमी विकसित देशांमध्ये अशा घटनांचा प्रभाव जास्त असतो. हवामान बदलाची समस्या टाळण्यासाठी लोकांनी जागरूक होण्याची गरज आहे.