माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांच्या अंत्यसंस्कारांना उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान मोदी निगम बोध घाटावर पोहोचले आहेत.त्यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह निगम बोध घाटावर उपस्थित आहेत. तसेच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूही पोचल्या आहेत. माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी निगम बोध घाट येथे आणण्यात आले आहे.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाच्या सोबत असलेल्या लष्कराच्या वाहनात राहुल गांधी उपस्थित होते. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी काँग्रेस खासदार प्रियांका गांधी वड्रा यांचे निगम बोध घाटावर आगमन झाले आहे.
शुक्रवारी सिंग यांच्या निवासस्थानी श्रद्धांजली वाहत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचे निधन हे देशाचे मोठे नुकसान असल्याचे म्हटले आहे .“डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने मोठी हानी झाली आहे. देशाने एक प्रख्यात राजकारणी, प्रख्यात अर्थतज्ञ आणि प्रतिष्ठित नेता गमावला आहे,” असे मोदी म्हणाले आहेत. तिरंग्यात लपेटलेले, सिंह यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी, 3 मोतीलाल नेहरू रोड येथे ठेवण्यात आले, जेथे त्यांचे कुटुंब, त्यांची पत्नी गुरशरण कौर आणि मुली उपस्थित होते. अनेक नेते, पक्षाचे कार्यकर्ते आणि जनतेने ल्युटियन्सच्या दिल्लीतील विस्तीर्ण बंगल्यावर त्यांना आदरांजली वाहिली, जिथे मनमोहन सिंग यांचे दशकाहून अधिक काळ वास्तव्य होते.
डॉ.मनमोहन सिंग यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. घरीच बेशुद्ध पडल्यानंतर त्यांना रात्री ८.०६ वाजता दिल्ली एम्समध्ये आणण्यात आले होते. मात्र उपचारांदरम्यान त्यांनी रात्री ९.५१ वाजता अखेरचा श्वास घेतला.