भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ह्या वर्षातील शेवटच्या आणि बहुप्रतीक्षित मोहिमेसाठी आज सज्ज आहे. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर (SDSC) मधून आज रात्री ९:५८ वाजता स्पेस डॉकिंग प्रयोग (स्पॅडेक्स) प्रक्षेपित केला जाईल. SpaDeX या मिशनच्या यशानंतर भारत अमेरिका, रशिया आणि चीन यांच्यानंतरचा चौथा देश ठरणार आहे. दोन अंतराळयान किंवा उपग्रहांना बाह्य अवकाशात डॉक (जोडणे) आणि अनडॉक (वेगळे) करण्याची क्षमता सध्या फक्त या देशांकडे आहे.
या मोहिमेत बुलेटच्या वेगापेक्षा दहापट वेगाने अंतराळात प्रवास करणारी दोन यान एकत्र केली जातील, याला डॉकिंग म्हणतात.हे ट्विन स्पेसक्राफ्ट ३० डिसेंबर २०२४ रोजी रात्री ९.५८ वाजता पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल (PSLV) वरून प्रक्षेपित केले जाईल. या मोहिमेचे उद्दिष्ट दोन छोटे अंतराळ यान वापरून स्पेसमध्ये डॉकिंग तंत्राचे प्रदर्शन करणे आहे. ही कामगिरी भारताच्या अंतराळ क्षेत्रातील प्रगतीचे प्रतीक असणार आहे. संपूर्ण देश भारतीय अंतराळ विज्ञानाच्या या ऐतिहासिक क्षणाला थेट पाहण्यासाठी उत्सुक असेल. स्पैडेक्स मोहिमेचे पीएसएलव्हीवरून थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी इस्रोने व्यवस्था केली आहे.
इस्रोच्या मते, या स्पैडेक्स मिशनमध्ये दोन स्पेसक्राफ्ट समाविष्ट आहेत – SDX01 (चेसर) आणि SDX02 (टार्गेट). हे पृथ्वीच्या लोअर ऑर्बिटमध्ये डॉकिंग करण्याचा प्रयत्न करतील.
यामुळे भारताचा अंतराळ विज्ञान क्षेत्रात आणखी एक नवा विक्रम प्रस्थापित होणार आहेच . पण त्याचबरोबर ही मोहीम भारताच्या भविष्यातील अंतराळ मोहिमांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे . ज्यामध्ये चंद्रावरून माती आणि खडक पृथ्वीवर आणणे, भारतीय अंतराळ स्थानक बांधणे आणि चंद्रावर अंतराळवीर पाठवणे या मोहिमांसाठी लाभदायी ठरेल.या मिशनच्या यशस्वी प्रक्षेपणासह इस्रो २०२४ ला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करणार आहे.