मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी घडली होती .यानंतर अनेक दिवस उलटूनही मुख्य आरोपीला अदयाप पकडण्यात न आल्यामुळे सर्व बाजुंनी निषेध व्यक्त केला जात आहे. या घटनेतील काही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, या घटनेतील काही आरोपी अद्यापही फरार आहेत. फरार आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी आणि संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ २ दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यात सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात सर्वपक्षीय नेते आणि नागरिक सहभागी झाले होते.
या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्याचे शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे .तसेच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला नाही तर नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा खासदार बजरंग सोनवणे यांनी दिला आहे .खासदार सोनावणें यांनी पोलीस आणि सीआयडीला अल्टिमेटम दिले आहे. 02 जानेवारीपर्यंत मुख्य आरोपीला पकडण्यात आले नाही तर आपण आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा सोनावणे यांनी दिला आहे.
मला याबाबतीत कोणीही काही सांगितलेले नाही, उपोषण करण्याचा निर्णय हा माझा एकट्याचा आहे. मात्र, बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून मला ज्यांनी निवडून दिले आहे. त्यांच्या न्यायासाठी लढणं हे माझे काम आहे. देशमुख कुटुंबाला न्याय मिळाला नाही तर मी उपोषण करणार आहे. देशमुख कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत मी लढत राहणार आहे”, असे बजरंग सोनवणे यांनी म्हटले आहे.