बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. घटनेनंतर सध्या राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या घटनेला २० दिवस उलटल्यानंतर अद्याप मुख्य आरोपीला पोलीस पकडू शकलेले नाहीत. याचा सर्वच स्तरावरुन निषेध केला जात आहे. यामध्ये मुख्य संशयित आरोपी म्हणून वाल्मिक कराड याचे नाव पुढे आले असून तो मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचा आहे, असा आरोप संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आणि गावकऱ्यांकडून केला जात होता.
अखेर आज वाल्मिक कराड सीआयडीला शरण आला आहे. पुण्यात त्याने सीआयडी समोर शरणागती पत्करली आहे. आता सीआयडी त्याची कसून चौकशी करणार असून त्याला कोर्टात हजर केले जाणार आहे.
वाल्मिक कराडने शरणागती पत्करण्यापूर्वी एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्याने एक मोठा दावा करत म्हंटले आहे की, “माझे नाव विनाकारणच या प्रकरणात गोवण्यात आले आहे. तरी मी पोलिसांना विनंती करतो की, संतोष भय्या यांच्या हत्येमागे असणाऱ्या गुन्हेगाराला फाशीचे शिक्षा द्यावी . यासाठीच्या आवश्यक चौकशीकरता माझे पोलिसांना पूर्ण सहकार्य असेल. राजकीय द्वेषापोटी माझे नाव या प्रकरणाशी जोडले जात आहे. पोलीस तपासात जे निष्कर्ष येतील आणि यात जर मी दोषी ठरलो तर न्यायदेवता जी शिक्षा देईल ते भोगण्यास मी तयार आहे”.
संतोष देशमुख यांच्या हत्येमागे वाल्मिक कराडचे नाव घेतले जात आहे. त्याअनुषंगाने आता त्याची चौकशी होणार आहे. वाल्मिक कराड याच्यावर खंडणीचे आरोप आहेत. त्यांच्यावर इतरही गंभीर आरोप आहेत. पण खंडणी प्रकरणात तो सीआयडीला हवा होता. त्यामुळे सीआयडीने 9 पथकं तयार केली होती. त्याचा महाराष्ट्रासह कर्नाटकात शोध घेण्यात येत होता.
वाल्मिक कराड हा उज्जैनला गेल्याचेही सांगितलं जात होते. त्यामुळे पोलीस आणि सीआयडी अलर्ट झाले होते. मात्र अखेर आज त्याने स्वत:हून पुणे पोलीस आणि सीआयडीसमोर शरणागती पत्करली आहे. त्यामुळे आता त्याची कसून चौकशी होणार असून तपासातून अधिक माहिती समोर येणार आहे.