भारत आणि अमेरिकेसह जगातील अनेक देशांमध्ये यावर्षी सार्वत्रिक निवडणुका झाल्या. काही ठिकाणी सत्तापालट झाला तर काही ठिकाणी धक्कादायक निकाल आले.मात्र या सार्वत्रिक निवडणुकांच्या निकालांचा जागतिक व्यवस्थेवर परिणाम झालेला दिसून आला. काही देशांमध्ये जेष्ठ नेते सक्रिय राजकारणातून गायब झाले, तर काही देशांमध्ये नवीन चेहऱ्यांनी जागतिक राजकारणात आपला ठसा उमटवला. जाणून घ्या या वर्षी कुठे निवडणुका झाल्या आणि कोण बनले पंतप्रधान किंवा राष्ट्रपती…
भारत-
जगातील सर्वात मोठ्या लोकशाही म्हणजेच भारतात 18व्या लोकसभेसाठी सार्वत्रिक निवडणुका झाल्या. एप्रिल ते जून या काळात सात टप्प्यांत मतदान झाले. 4 जून रोजी निकाल लागला तेव्हा भाजपच्या जागा तुलनेने कमी झाल्या असल्या तरी एनडीएला भारतात पुन्हा पूर्ण बहुमत मिळाले. एनडीएने 303 मतांनी विजय मिळवून पुन्हा सरकार स्थापन केले. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान झाले. मात्र, या निवडणुकीत भाजप केवळ 240 जागांवरच मर्यादित राहिला. नरेंद्र मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेणारे दुसरे नेते बनले आहेत. मोदींचा तिसरा विजय भारताचे जागतिक मंचावरचे स्थान मजबूत करेल अशी सगळ्यांना आशा आहे.
अमेरिका-
जगातील सर्वात जुन्या लोकशाहीत म्हणजेच युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकामध्ये या वर्षी ५ नोव्हेंबर रोजी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांचा मोठ्या फरकाने पराभव करत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत. याआधी ते 2016 ते 2020 पर्यंत अमेरिकेचे अध्यक्ष होते. ट्रम्प हे 20 जानेवारी 2025 रोजी अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत.
रशिया-
युक्रेनविरुद्धच्या युद्धादरम्यान रशियामध्ये एप्रिल २०२४ मध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीत व्लादिमीर पुतिन यांना 87 टक्क्यांहून अधिक मते मिळाली. पुतीन हे ५व्यांदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. निवडणूक जिंकल्यानंतर आता ते आणखी ६ वर्षे सत्तेत राहणार असून 2030 पर्यंत रशियाचे नेतृत्व करणार आहेत.
ब्रिटन-
ब्रिटनमध्येही याच वर्षी ४ जुलै रोजी सार्वत्रिक निवडणुका झाल्या. यावेळी 14 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर ब्रिटनमध्ये मजूर पक्षाचा विजय झाला. ऋषी सुनक यांच्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाचा दारूण पराभव झाला. ब्रिटनमधील 650 पैकी 410 जागांवर मजूर पक्षाने विजयाचा झेंडा फडकावून इतिहास रचला आहे. कीर स्टार्मर ब्रिटनचे नवे पंतप्रधान झाले.
दक्षिण आफ्रिका-
दक्षिण आफ्रिका या आफ्रिका खंडातील देशामध्येही या वर्षी सार्वत्रिक निवडणुका झाल्या. 29 मे 2024 रोजी झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी पक्ष आफ्रिकन नॅशनल काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला परंतु त्याच्या समर्थनात लक्षणीय घट झाली. शेवटी असे झाले की आफ्रिकन नॅशनल काँग्रेसने संसदेत आपले बहुमत गमावले. रामाफोसाच्या आफ्रिकन नॅशनल काँग्रेस पार्टी (ANC) ने सरकार स्थापन करण्यासाठी सर्वात मोठा विरोधी पक्ष, डेमोक्रॅटिक अलायन्स (DA) सोबत युती केली आणि सिरिल रामाफोसा सलग दुसऱ्यांदा देशाचे अध्यक्ष बनले.
जपान-
आशिया खंडातील एकमेव विकसित देश असलेल्या जपानमध्येही यंदा निवडणुका झाल्या. पण यावेळी पंतप्रधान शिगेरू इशिबा यांच्या पक्ष लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीला बहुमत मिळाले नाही. सत्ताधारी आघाडीला 215 जागा मिळाल्या आणि बहुमताच्या तुलनेत 18 जागा कमी पडल्या.तर प्रमुख विरोधी कॉन्स्टिट्यूशनल डेमोक्रॅटिक पार्टीला 148 जागा मिळाल्या, जे गेल्या निवडणुकीपेक्षा 50 जागा जास्त आहेत.
फ्रान्स-
जुलै महिन्यात फ्रान्समध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या पण कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळू शकले नाही. या निवडणुकीत डाव्या नवीन पॉप्युलर फ्रंट आघाडीने १८८ जागा जिंकल्या. त्याच वेळी, अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या मध्यवर्ती आघाडीला केवळ 161 जागा मिळू शकल्या. उजव्या विचारसरणीचा राष्ट्रीय रॅली १४२ जागा मिळवून तिसरा सर्वात मोठा पक्ष ठरला. पण फ्रान्समध्ये कोणत्याही पक्षाला बहुमताचा आकडा पार करता आला नाही.
बांगलादेश-
बांगलादेशमध्ये या वर्षाच्या सुरुवातीला जानेवारीत सार्वत्रिक निवडणुका झाल्या. या निवडणुकांमध्ये माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या पक्षाला ऐतिहासिक विजय मिळाला होता. शेख हसीना यांनी 300 पैकी 222 जागा जिंकल्या. तर अपक्ष उमेदवारांनी 66 जागा जिंकल्या. तर खालिद झिया यांच्या पक्षाने या निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. शेख हसीना पाचव्यांदा बांगलादेशच्या पंतप्रधान झाल्या पण त्या केवळ सहा ते साडेसहा महिनेच या पदावर राहू शकल्या. यानंतर ऑगस्टमध्ये बांगलादेशी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने त्यांना सत्तेवरून हटवले आणि जीव वाचवण्यासाठी त्यांनी देश सोडून भारतात आसरा घ्यायची वेळ आली.
पाकिस्तान-
बांगलादेशपाठोपाठ पाकिस्तानमध्ये ८ फेब्रुवारीला निवडणुका झाल्या. 336 जागांपैकी पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (पीएमएल) 75 जागा जिंकण्यात यशस्वी ठरले.बिलावल भुट्टो यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीने (पीपीपी) 54 जागा जिंकल्या. माजी पंतप्रधान इम्रान खान यांना निवडणूक लढवण्याची परवानगी नव्हती. त्यांच्या समर्थकांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली आणि 100 जागा जिंकल्या.मात्र, त्यांना सरकार स्थापन करण्याची परवानगी देण्यात आली नाही आणि शेवटच्या क्षणी पीएमएल-एन, पीपीपी, एमक्यूएम आणि इतर पक्षांच्या युतीला परवानगी मिळाली आणि नवाझ शरीफ यांचे बंधू शेहबाज शरीफ दुसऱ्यांदा पाकिस्तानचे पंतप्रधान झाले.
श्रीलंका-
श्रीलंकेत 21 सप्टेंबर रोजी राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत डाव्या नेते अनुरा कुमार दिसानायके यांना मोठा विजय मिळाला. त्यांना 50 टक्क्यांहून अधिक मते मिळाली. रनिल विक्रम सिंघे हे तिसरे तर विरोधी पक्षनेते साजिथ प्रेमदासा दुसऱ्या स्थानावर आहेत. यानंतर, संसदीय निवडणुकीत देखील अध्यक्ष अनुरा कुमारा दिसानायके यांच्या पक्ष नॅशनल पीपल्स पॉवर (NPP) ने 225 सदस्यांच्या संसदेत 123 जागा जिंकून बहुमताचा टप्पा गाठला.