२०२४ हे वर्ष संपण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे सध्या मुंबई, पुणे, नागपूर यांसह बहुतांश ठिकाणी नवीन वर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र सज्ज झाला आहे. त्यासाठी मुंबई लोकलकडून आज रात्री विशेष लोकल सोडण्यात येणार आहेत. तर दुसरीकडे शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आज मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर सज्ज झाले आहेत. त्याचबरोबर मुंबई पोलिसांनी जय्यत तयारी केली असून मुंबईत ठिकठिकाणी थर्टीफर्स्ट निमित्ताने चालणाऱ्या पार्टींवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच मुंबईकरांच्या संरक्षणासाठी १५ हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तसेच ‘ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह’च्या विरोधात पोलिस विशेष मोहीम राबवणार आहेत.ठाण्याच्या खाडीलगत तसेच निर्जनस्थळी होणाऱ्या रेव्ह पार्टीवर पोलिसांचा यंदा ड्रोन वॉच असणार आहे.मुंबई शहरातील हॉटेल्स, पब्ज, मॉल्स आणि चौपाट्यांवर होणारी गर्दी लक्षात घेऊन सशस्त्र दल, राज्य राखीव दल, बॉम्बशोधक आणि नाशक पथके, श्वान पथके, दंगल नियंत्रक पथके, शीघ्र कृती दल आणि फोर्सवन आदी विशेष पथकांवरही सुरक्षेची जबाबदारी आहे. दुसरीकडे पोलिसांनी समुद्रातील गस्तीमध्ये वाढ केली आहे. मुंबईतील वाहतुकींमध्ये बदल करण्यात आला आहे. ताज हॉटेलच्या समोरील रस्ता संध्याकाळी वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.तसेच कल्याणमध्ये 17 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असणार आहे. या पार्श्वभूमीवर 2 सहाय्यक पोलीस आयुक्त, 83 अधिकारी, 532 अंमलदार तैनात असणार आहेत. त्यासोबत तसेच 27 बीट मार्शल पेट्रोलिंग, 20 मोबाईल पेट्रोलिंग ही असणार आहे.
तर पुण्यात सरत्या वर्षाला निरोपाच्या पार्टीवर नियंत्रण घालण्यासाठी 3000 पोलिस तैनात करण्यात आले आहेत. ३१ डिसेंबर रोजी पुणे पोलिसांनी चांगलीच खबरदारी घेतली आहे.सर्वच पोलिस ठाण्यांतर्गत तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यासोबतच पुणे शहरात ३ हजारांवर पोलिस अधिकारी आणि कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात असणार आहेत. त्यासोबत ८०० वाहतूक पोलिस कर्मचारी चौका-चौकांमध्ये तैनात असणार आहेत. पुणे शहरात प्रामुख्याने २७ महत्त्वांच्या ठिकाणांवर ड्रंक अँड ड्राइव्हची कारवाई केली जाणार आहे.
मुंबई, पुण्यांनंतर नाशिकचे पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. नाशिक शहरातील 65 स्पॉटवर ड्रिंक अँड ड्राईव्हची नाकाबंदी करण्यात आली आहे. तसेच तीन हजार पोलिसांचा फौजफाटाही तैनात करण्यात आला आहे. तसेच 200 पोलीस अधिकारी, 3000 पोलीस अंमलदार आणि सहाशे होमगार्डही रस्त्यावर असणार आहेत. यासोबतच गुंडाविरोधी पथक, अमली पदार्थ विरोधी, गुन्हे शोध पथक, बॉम्ब शोधक पथकही तैनात असणार आहेत. महिलांच्या सुरक्षेसाठी दामिनी, फिरस्ती पथक सीआर मोबाईल हे पोलिसांचे फिरस्ती पथकही सज्ज आहेत.गरज पडल्यास अवघ्या चार मिनिटात ही पथक प्रतिसाद देत हजर होणार आहेत.
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक कोकणात दाखल झाले आहेत. थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी पर्यटकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. अनेक जिल्ह्यातील समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजले आहेत. गणपतीपुळ्यातील समुद्रकिनारी पर्यटकांची तोबा गर्दी पाहायला मिळत आहे. या ठिकाणी अनेक पर्यटक समुद्रात डुंबण्याचा मनमुराद आनंद लुटत आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक कोकणात दाखल झाले आहेत.