मणिपूरमधील हिंसाचारावर मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी राज्याच्या जनतेची माफी मागितली आहे. मणिपूरमध्ये गेल्या वर्षी मे महिन्यापासून जातीय हिंसाचार सुरू आहे, ज्यामध्ये आतापर्यंत 200 हून अधिक लोक मारले गेले आहेत आणि हजारो लोक बेघर झाले आहेत. अशातच मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेची माफी मागितली आहे. त्यांनी मणिपूरच्या कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल खेद व्यक्त करत आगामी वर्षात संपूर्ण राज्यात स्थिती पूर्ववत होईल अशी आशा व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री सिंग यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
‘मणिपूरमध्ये मे 2023 ते ऑक्टोबर 2023 या कालावधीत गोळीबाराच्या 408 घटनांची नोंद झाली आहे. नोव्हेंबर 2023 ते एप्रिल 2024 या कालावधीत 345 घटना घडल्या. मे 2024 पासून 112 घटनांची नोंद झाली आहे. नोव्हेंबरमध्ये मणिपूरच्या जिरीबाममध्ये तीन महिला आणि त्यांच्या तीन मुलांची हत्या झाल्यानंतरही गोंधळ उडाला होता.
राज्याच्या जनतेची माफी मागताना मुख्यमंत्री सिंग म्हणाले की, यंदाचे 2024 हे संपूर्ण वर्ष खूप वाईट गेले. राज्यात 3 मे 2023 पासून आजपर्यंत जे काही घडले त्याबद्दल मी राज्यातील जनतेची माफी मागतो. अनेकांनी आपल्या प्रियजनांना गमावले. अनेकांनी घरे सोडली. याचे मला दु:ख झाले आहे.
मात्र, गेल्या महिनाभरापासून राज्यात शांतता आहे. हिंसाचाराची कोणतीही घटना घडली नाही. तुरळक निदर्शने वगळता लोक रस्त्यावर उतरले नाहीत.सरकारी कार्यालये सुरळीत सुरु आहेत. गेल्या तीन-चार महिन्यांपासून असलेली थोडी शांततापूर्ण परिस्थिती पाहता, 2025 मध्ये राज्यात पूर्वस्थिती पूर्ववत होईल अशी मला आशा असल्याचे सिंग म्हणाले आहेत.
राज्यातील सततच्या हिंसाचारामुळे एन बिरेन सिंग यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारवर प्रचंड दबाव असून सिंग यांना पदावरून हटवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. एनडीएचा मित्रपक्ष एनपीपीनेही मणिपूर सरकारचा पाठिंबा काढून घेतला असून नेतृत्व बदलाची मागणी केली आहे.
मणिपूरमधील मेईतेई समुदाय आणि कुकी समुदाय यांच्यात गेल्या वर्षी 3 मे 2023 रोजी वाद सुरू झाला. व पुढे २०२४ मध्ये हा वाद वाढत जाऊन याला हिंसक वळण मिळाले. या हिंसाचारात २५० हून अधिक लोक मारले गेले आहेत आणि हजारो विस्थापित झाले आहेत. केंद्र सरकारने या हिंसाचाराची दखल घेत अनेक जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या संवेदनशील झोनमध्ये सैन्य तैनात केले आहे ज्यामुळे या भागात गोळीबाराच्या घटनांमध्ये घट झाली आहे.