पुणे – दि. ३० डिसेंबर २०२४ या दिवशी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने एक परिपत्रक काढून, पुणे विद्यापीठ आवारामध्ये त्याचबरोबर नाशिक व अहिल्यानगर येथील उपकेंद्रांच्या आवारांमध्ये कोणतेही कार्यक्रम, उपक्रम, आंदोलन, पथनाट्य किंवा कोणतेही जागृतीपर अभियान असे कार्यक्रम घ्यावयाचे असल्यास किमान ८ दिवस आधी विद्यापीठाची परवानगी घेणे आवश्यक आहे, असा हिटलरशाहीसारखा हुकूम जाहीर केला आहे. या विरोधामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने तत्काळ आक्रमक भूमिका घेत निदर्शने केली आहेत.
यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारती बाहेर अभाविप कार्यकर्ते व अन्य विद्यार्थी एकत्रित येऊन आक्रमक झाले. संबंधित परिपत्रक तत्काळ रद्द करावे आणि कोणतेही कार्यक्रम, उपक्रम, अभियान, आंदोलन किंवा पथनाट्य अशा पद्धतीचे कार्यक्रम घेण्याच्या पूर्वपरवानगीचा कालावधी २४ तास करण्यात यावा यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने मागणी केली. यावेळी सुरक्षारक्षकांचे कडं भेदून मुख्य इमारती बाहेर जाऊन आंदोलकांनी घोषणा दिल्या. त्यानंतर विद्यापीठाच्या कुलसचिव ज्योती भाकरे यांच्याशी चर्चा करून आंदोलन थांबवण्यात आले.
यावेळी बोलताना हर्षवर्धन हरपुडे, पुणे महानगर मंत्री असे म्हणाले की, “सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ एका बाजूला दोन दिवसांमध्ये स्वतःचे गेस्ट हाऊस हे लग्नाच्या वऱ्हाडासाठी पूर्णतः देऊन टाकते, पण विद्यार्थ्यांना जागृती पर कार्यक्रम घेण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना स्वतःचे हक्क मागण्यासाठी ८ दिवस आधी परवानगी घ्यावी हा नियम अत्यंत चुकीचा आहे. आणि हे परिपत्रक तत्काळ रद्द न झाल्यास अभाविप अजून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल.”
“पुणे विद्यापीठ कॅम्पस मध्ये अनेक प्रकारच्या समस्या वेळोवेळी येत असतात, मग त्या हॉस्टेल, मेस किंवा कोणत्याही स्वरूपातील असतील, त्यासाठी ८ दिवस आधी परवानगी कशी मागणार? आणि कोणताही कार्यक्रम किंवा महापुरुषांच्या जयंती साजरी करण्यासाठीसुद्धा विद्यापीठाची ८ दिवस आधी परवानगी मागणे हे अत्यंत चुकीचे आहे.” असे मत आदित्य डुंबरे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अध्यक्ष यांनी व्यक्त केले आहे .