दिनांक २ जानेवारी १९४० या दिवशी कराड मध्ये भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेस भेट दिली होती. या ऐतिहासिक घटनेचे स्मरण म्हणून ज्या ठिकाणास डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भेट दिली त्या श्री भवानी संघ स्थानावर वैचारिक कार्यक्रमाचे आयोजन कराड येथे लोककल्याण मंडळ ट्रस्ट द्वारे करण्यात येत आहे.
माणसा माणसात वैचारिक मतभेद असले तरी एकमेकांच्या विचाराचा आदर करून सामाजिक सलोखा जपता येऊ शकतो आणि यातूनच बंधुता निर्माण होते. याच प्रकारचा संदेश डॉ आंबेडकर यांनी कराड मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात दिला होता. त्याचे स्मरण म्हणून कराडच्या या ऐतिहासिक संघ शाखेत बंधुता परिषद आणि आपुलकी मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.
या बंधुता परिषद निमित्त आयोजित परिसंवादात बौध्द युवक संघटनेचे अध्यक्ष ॲड विजय गव्हाळे, दलित महासंघाचे अध्यक्ष प्रा. मच्छिंद्र सकटे, राज्यसभेचे माजी खासदार प्रा. अमर साबळे आणि विचारवंत ॲड क्षितिज गायकवाड सहभागी होणार आहेत. सदर परिसंवादाचे अध्यक्ष म्हणून विवेक विचार मंचाचे अध्यक्ष आणि पुण्याचे माजी खासदार श्री प्रदीप दादा रावत उपस्थित राहणार आहेत. दिनांक २ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता ऐतिहासिक भवानी मैदान, पंतांचा कोट, सोमवार पेठ, कराड येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सामजिक सलोखा निर्माण करण्यासाठी आयोजित या कार्यक्रमास कराड व परिसरातील सर्व जिज्ञासू नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कराड मधील लोककल्याण मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष श्री विजय जोशी आणि पदाधिकाऱ्यांनी केले आहे.