पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण केले आणि महिला सक्षमीकरणासाठी त्या प्रेरणास्थान असल्याचे नमूद केले आहे.पंतप्रधान मोदींनी एक्सवरील आपल्या पोस्टमध्ये असे म्हंटले आहे की , “सावित्रीबाई फुले यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. महिला सक्षमीकरणासाठी त्या प्रेरणादायी आहेत आणि शैक्षणिक आणि सामाजिक सुधारणेच्या क्षेत्रातील नेत्या आहेत. “आम्ही लोकांसाठी जीवनाचा दर्जा उत्तम ठेवण्यासाठी कार्य करत असताना त्यांचे प्रयत्न आम्हाला प्रेरणा देत आहेत.”
https://twitter.com/narendramodi/status/1875042316865753475
सावित्रीबाई फुले यांचा जन्म महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे ३ जानेवारी १८३१ रोजी झाला होता. सावित्रीबाई फुले या महाराष्ट्रातील भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि कवयित्री होत्या. त्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका मानल्या जातात. त्यांचे पती ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांना भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते.
ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी 1848 मध्ये पुण्यातील भिडे वाडा येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरु केली. सावित्रीबाई यांना महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणा चळवळीतील महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व मानले जाते. महिला शिक्षण आणि सामाजिक समानतेसाठी त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी त्यांची जयंती महिला शिक्षण दिन म्हणूनही साजरी केली जाते.