गाझा पट्टीवर झालेल्या इस्रायली हल्ल्यात तीन मुले आणि हमास संचालित पोलिस दलातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांसह १० जण ठार झाले आहेत. पॅलेस्टिनी आणि रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी संध्याकाळी ही माहिती दिली आहे. इस्त्रायली सैन्याने दक्षिण गाझामधील अल-मवासीच्या तथाकथित “मानवतावादी क्षेत्र” वर बॉम्बफेक केली, ज्यात १० पॅलेस्टिनी ठार झाले.दरम्यान,या हल्ल्यानंतर इस्रायलकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
इस्रायलने मानवतावादी क्षेत्र घोषित केलेल्या मुवासी नावाच्या परिसरात उभारलेल्या तंबूवर गुरुवारी सकाळी हल्ला झाला आहे. थंडी आणि पावसापासून वाचण्यासाठी हजारो विस्थापित लोक या भागात उभारलेल्या तंबूत राहत आहेत.
त्याचवेळी इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल कॅटझ यांनी हमासला इशारा दिला आहे की, जर त्यांनी त्यांच्या देशावरील हल्ले थांबवले नाहीत आणि गाझामधील कैद्यांची सुटका केली नाही, तर त्यांच्यावर यापुढे अभूतपूर्व ताकदीने हल्ले केले जातील. स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांच्या मते, इस्रायलच्या हल्ल्यात गाझामधील 45,000 हून अधिक पॅलेस्टिनी ठार झाले आहेत आणि 100,000 हून अधिक जखमी झाले आहेत. ते म्हणतात की मृतांमध्ये अर्ध्याहून अधिक महिला आणि मुले आहेत.
7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासच्या नेतृत्वाखालील अतिरेक्यांनी इस्रायलवर केलेल्या हल्ल्यापासून युद्ध सुरू झाले.यावेळी सुमारे 1,200 लोकांची हत्या केली आणि सुमारे 250 लोकांचे अपहरण केले होते.