देशातील प्रख्यात अणुशास्त्रज्ञ आणि पोखरण १ व पोखरण २ अणुचाचण्यांचे शिल्पकार राजगोपाल चिदंबरम यांचे निधन झाले. मृत्यूसमयी ते 88 वर्षांचे होते. चिदंबरम यांनी पहाटे 3.20 वाजता मुंबईच्या जसलोक रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांनी अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आणि भारत सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम केले होते.
गेल्या काही दिवसांपासून चिदंबरम यांची प्रकृती ठीक नव्हती. शास्त्रज्ञ म्हणून डॉ. चिदंबरम यांनी भाभा अणु संशोधन केंद्राचे संचालक, अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आणि अणुऊर्जा विभागाचे सचिव म्हणून काम केले होते. तसेच 1994-95 दरम्यान आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीच्या संचालक मंडळाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. डॉ. चिदंबरम हे भारत सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागारही होते. डॉ. चिदंबरम यांनी भारताच्या अण्वस्त्र कार्यक्रमात महत्त्वाची भूमिका बजावली होती. पोखरण-I (1975) आणि पोखरण-2 (1998) च्या चाचणीचे शिल्पकार म्हणून त्यांना ओळखले जात होते.
1974 मध्ये पोखरण चाचणी रेंजवर भारताची पहिली अणुचाचणी (स्माइलिंग बुद्धा) करणाऱ्या टीमचा ते भाग होते. मे 1998 मध्ये दुसऱ्या अणुचाचणीच्या तयारीसाठी अणुऊर्जा विभाग (DAE) संघाचे नेतृत्व आणि प्रतिनिधित्व केल्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळाली. अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळात 1998 मध्ये पोखरण रेंजवर भारताच्या दुसऱ्या अणुचाचणीवेळी ते एपीजे अब्दुल कलाम यांच्या टीमचा भाग होते.
अणुऊर्जेच्या शांततापूर्ण वापराचे समर्थक म्हणून त्यांनी भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमाचे नेतृत्व केले होते . डॉ. चिदंबरम यांना पद्मश्री (1975) आणि पद्मविभूषण (1999) यांच्यासह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.
डॉ आर. चिदंबरम यांचे योगदान केवळ भारताच्या अणुकार्यक्रमापुरतेच नाही तर भारताला विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात स्वावलंबी बनवण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. होती . त्यांच्या निधनाने विज्ञान आणि संशोधन जगताची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे.