चीनमध्ये ह्यूमन मेटान्यूमो (HMPV) या व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. या व्हायरसने सध्या चीनमध्ये हाहाकार माजवला असल्याची बातमी समोर येत आहे.अशातच आता भारतातही याचा पहिला रुग्ण आढळून असून,बंगळुरूमध्ये आठ महिन्यांच्या चिमुकलीला एचएमपीव्ही विषाणूची लागण झाली आहे. मात्र या चिमुकलीची प्रकृती सध्या बरी असल्याची माहिती आहे.
आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार एका खासगी रुग्णालयात आठ महिन्याच्या मुलीची चाचणी केली तेव्हा तिला HMPV चा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात शासकीय स्तरावर मुलीची कोणतीही चाचणी आज 6 जानेवारीला सकाळपर्यंत झालेली नाही. आता खासगी रुग्णालयाच्या अहवालानंतर शासकीय रुग्णालय आणि प्रयोगशाळेत तपासणी झाल्यानंतर यासंदर्भात अधिक स्पष्टता होईल.
आरोग्य मंत्रालयाच्या मते, हा एक सामान्य श्वसन विषाणू आहे, यामुळे विशेषत: सर्दी आणि फ्लू सारख्या समस्या उद्भवतात. राष्ट्रीय आजार नियंत्रण संस्थेच्या (NCDC) माहितीनुसार, 2023 मध्ये चीनमध्येही या विषाणूची प्रकरणे नोंदवली गेली होती आणि इतर देशांमध्येही आढळून आली होती.
तसेच आरोग्य मंत्रालयातून समोर आलेल्या माहितीनुसार , HMPV म्हणजेच ह्युमन मेटा न्यूमोव्हायरस साधारणपणे 11 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये आढळतो आणि फ्लूच्या सर्व नमुन्यांपैकी 0.7 टक्के HMPV असतात.
केंद्र सरकारने एका निवेदनात म्हटले आहे की, श्वासोच्छवासाच्या संबधित आजारांच्या कोणत्याही वाढीला सामोरे जाण्यासाठी देश पूर्णपणे तयार आहे. या हंगामात RSV आणि HMPV हे सामान्य इन्फ्लूएंझा विषाणू आहेत, ज्यामुळे चीनमध्ये फ्लूचे प्रमाण वाढत आहे. मात्र भारत सरकार परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे. तसेच, WHO ला चीनमधील परिस्थितीबद्दल वेळोवेळी अपडेट देण्यास सांगण्यात आले आहे.