पालघर जिल्हा पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्याने हादरला आहे.पालघर जिल्ह्यातील डहाणू, दापचरी परिसरात सोमवारी पहाटे 3 वेळा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. यामुळे मात्र नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी तालुक्यात (२०१८)पासून भूकंपाचे धक्के बसण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवल्यामुळे भूकंपाचे सत्र पुन्हा सुरू होण्याची भीती व्यक्त होत आहे. डहाणू आणि दापचरी परिसरातील गावांना सतत भूकंपाचे सौम्य आणि मध्यम स्वरुपाचे धक्के बसत असल्याने सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, शिक्षक यांच्यामध्ये भीतीचे वातावरण आहे.
पालघर जिल्ह्यात 2018 पासून वारंवार भूकंपाचे हादरे जाणवत आहेत. सतत बसणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे ग्रामीण भागातील काही घरांच्या भिंतींना तडे गेले होते. याधी पालघर जिल्ह्यातील डहाणू, दापचरी आणि धुंदलवाडी परिसराला 31 डिसेंबर 2024 दुपारी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येलाच हा धक्का बसल्याने स्थानिकांमध्ये भीती निर्माण झाले होते. याआधीही ऑगस्ट 2024 आणि ऑक्टोबर 2024 मध्ये डहाणू तालुक्यात भुकंपाचे धक्के बसले होते.