सध्या सर्वत्र थंडीची लाट उसळली असून, राजधानी दिल्लीत देखील थंडीची कडाका जाणवत आहे. दिल्लीत थंडीसह दाट धुक्यांची लाट देखील पसरली आहे. अशा परिस्थितीत विमान सेवेला मोठा फटका बसला आहे. दाट धुक्यांमुळे अनेक विमानांना उशीर होत असून संपूर्ण उत्तर भारतात धुक्याने कहर केलेला दिसत आहे. IMD ने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी देशातील 7 विमानतळांवर झिरो दृश्यमानतेची (व्हिजिबिलिटी) नोंद झाली. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय (IGI) विमानतळावर 400 उड्डाणे उशीर झाली. याशिवाय 19 उड्डाणे वळवावी लागली, तर 45 रद्द करण्यात आली. वळवलेल्या उड्डाणांमध्ये 13 देशांतर्गत, 4 आंतरराष्ट्रीय आणि 2 नॉन-शेड्युल्ड फ्लाइट्सचा समावेश आहे. याआधी शुक्रवारीही धुक्यामुळे दिल्लीत 400 हून अधिक उड्डाणे थांबवण्यात आली होती. यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. सकाळच्या सुमारास दिल्लीत दाट धुके पडले होते. यामुळे दिल्लीहून जाणाऱ्या आणि येणाऱ्या विमानांना फटका बसला आहे.
तर आज सकाळी 7:10 ते सकाळी 9 या वेळेत कोलकाता विमानतळावरील सर्व हवाई वाहतूक बंद करण्यात आली, असे विमानतळ संचालक प्रवत रंजन ब्यूरिया यांनी ही माहिती दिली.अंदाजे 30 येणाऱ्या आणि ३० जाणाऱ्या विमानांवर परिणाम झालेला बघायला मिळाला.ज्यामुळे प्रवाशांची लक्षणीय गैरसोय झाली.याव्यतिरिक्त, कोलकात्यात उतरण्यासाठी येणारी पाच उड्डाणे इतर विमानतळांवर वळवण्यात आली आहेत .