चीनमध्ये पसरत असलेल्या HMPV (ह्यूमन मेटान्यूमोव्हायरस) ने भारतात हजेरी लावली आहे. तसेच राज्यात सुद्धा या व्हायरसने एंट्री केली आहे. या ह्युमन व्हायरसचे नागपूरात 2 संशयित रूग्ण आढळले आहेत. परिणामी आरोग्य खातं अलर्ट मोडवर आले आहे, या पार्श्वभूमीवर केंद्रीय आणि राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी आज तातडीची बैठक बोलावली आहे.
नागपूरमध्ये एक 13 वर्षांची मुलगी आणि एक 7 वर्षाच्या मुलीत ही लक्षणं दिसून आली आहेत. सतत दोन दिवसांचा ताप आल्यानंतर कुटुंबाने एका खासगी लॅबमध्ये तपासणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. .मात्र दोन्ही मुलांना रुग्णालयात भरती करण्यात आलेले नाही. त्यांच्यावर घरीच उपचार करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी याबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी असे म्हटले आहे की, याबाबत आपण एक बैठक बोलावली आहे. हा विषाणू यापूर्वीपासूनच अस्तित्वात आहे. फक्त चीनमध्ये त्याची संख्या झपाट्याने वाढल्याने चीनने काळजी घेण्याचे काम केले आहे. आपल्याकडे याबाबत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना आलेल्या आहेत. आपली संपूर्ण यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. आरोग्य विभाग नागरिकांना योग्य त्या सूचना देतील. नागरिकांनी काळजी घ्यावी, घाबरण्याचे काहीही कारण नाही. ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे. त्यांना अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.