देशाची राजधानी दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहीर झाल्या आहेत. निवडणूक आयोगाने आज दुपारी २ वाजता पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली आहे . दिल्लीत ५ फेब्रुवारीला निवडणूक होणार असून ८ फेब्रुवारीला निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत. एकाच टप्प्यात निवडणूक पार पडणार असून आता दिल्लीत आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.
यावेळी दिल्लीतील एकूण मतदारांची संख्या १.५५ कोटींहून अधिक आहे. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या ८३,४९,६४५ तर महिला मतदारांची संख्या ७१,७३,९५२ आहे. तर तृतीय लिंगी मतदारांची संख्या १,२६१ आहे.तर २.०८ लाख मतदार असे आहेत जे पहिल्यांदा मतदान करणार आहेत.
दिल्ली विधानसभेचा कार्यकाळ २३ फेब्रुवारीला संपत आहे. दिल्ली निवडणूक ही मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या कार्यकाळातील शेवटची निवडणूक असेल. कारण ते १८ फेब्रुवारीला निवृत्त होत आहेत.
२०२० मध्ये, ६ जानेवारी रोजी निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आणि ८ फेब्रुवारी रोजी मतदान झाले होते. ११ फेब्रुवारी रोजी मतमोजणी पार पडली होती.