गेल्या काही दिवसांपासून अलमट्टी धरणाची उंची वाढण्यावरून वाद सुरु आहेत. कर्नाटक सरकार गेल्या वर्षभरापासून अलमट्टी धरणाची उंची वाढवणार असल्याचे सांगत आहे. मात्र, याला कोल्हापूर, सांगली आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी विरोध केला आहे. कारण जर अलमट्टी धरणाची उंची वाढवली तर याठिकाणी महापुराचा धोका वाढू शकतो. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील याबाबत मोठे विधान केले आहे.
कर्नाटकातील अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यास महाराष्ट्र शासनाचा देखील विरोध असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. तसेच यावर राज्य सरकारची यावर नजर असून, गरज पडल्यास सर्वेाच्च न्यायालयात धाव घेऊ असे भाष्य फडणवीस यांनी केले आहे.
अलमट्टी धरण भरले की त्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येतो. आणि त्याचा परिणाम म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात अनेकदा पूर सदृश परिस्थिती निर्माण होते. यासाठी धरणाची उंची वाढवण्यास आंध्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार विरोध करत आहे. मात्र तीन वर्षांपूर्वी या धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला असून त्यासाठीचे प्रयत्न सरकारने सुरु केले आहेत.
अलमट्टी धरणाच्या पूररेषेबाबत सरकार लक्ष ठेवून आहे. त्यासाठी समितीही स्थापन करण्यात आली आहे. समितीचा अहवाल अंतिम टप्प्यात आला आहे. शासनाचा प्रयत्न पूरस्थिती नियंत्रणात आणण्याचा आहे. त्यासाठी आवश्यकता पडल्यास सर्वोच्च न्यायालयात जाऊ,” अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात बोलताना दिली आहे.