पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आंध्र प्रदेश दौऱ्यावर असताना विशाखापट्टणममध्ये 2 लाख कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. यामध्ये ग्रीन हायड्रोजन सेंटर आणि मेडिसिन पार्कचा समावेश आहे. पंतप्रधान कार्यालयाने (PMO) एका निवेदनात म्हटले आहे की, हे प्रकल्प शाश्वत विकास, औद्योगिक वाढ आणि पायाभूत सुविधांच्या वाढीसाठी सरकारच्या मोठ्या प्रयत्नांचा एक भाग आहेत.
पंतप्रधान मोदींनी याबाबत एक्सवर पोस्ट करत म्हंटले आहेत की, हरित ऊर्जा, अक्षय ऊर्जा, पायाभूत सुविधा आणि इतरांशी संबंधित मोठ्या कामांचे उद्घाटन करण्यासाठी मी विशाखापट्टणमच्या लोकांना भेटण्यास उत्सुक आहे. NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड ग्रीन हायड्रोजन हब प्रकल्पाची पायाभरणी होणार आहे ही अतिशय आनंदाची बाब आहे. नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन अंतर्गत हे असे पहिले हब असेल.
Tomorrow and the day after, I will be in Andhra Pradesh and Odisha to attend key programmes. These include the inauguration and laying of foundation stones for various development works in Visakhapatnam and the Pravasi Bharatiya Divas in Bhubaneswar. https://t.co/nLbE4ZuPE1
— Narendra Modi (@narendramodi) January 7, 2025
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्यासमवेत पंतप्रधान रेल्वे झोनची पायाभरणी करतील. याशिवाय ते अनकापल्ले जिल्ह्यातील पुदिमडाका येथे एनटीपीसीच्या एकात्मिक हरित हायड्रोजन केंद्राची पायाभरणी करतील. या प्रकल्पांतर्गत कंपनी तीन टप्प्यांत 65,370 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. यानंतर पंतप्रधान नक्कापल्लीमध्ये 1877 कोटी रुपयांच्या मेडिसिन पार्कची व्हर्च्युअल माध्यमातून पायाभरणी करतील. देशाला औषधनिर्मिती क्षेत्रात स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने येथे ‘बल्क ड्रग पार्क’ उभारण्यात येणार आहे. हे उद्यान 2,002 एकर जागेवर सुमारे 11,542 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीत बांधले जाणार आहे. पायाभरणी समारंभ आणि उद्घाटन समारंभानंतर पंतप्रधान मोदी रोड शो करतील आणि एका जाहीर सभेलाही संबोधित करतील.
संध्याकाळी ओडिशासाठी होणार रवाना
आज संध्याकाळीच पंतप्रधान ओडिशाला रवाना होतील जिथे ते गुरुवारी १८ व्या प्रवासी भारतीय दिवस परिषदेचे उद्घाटन करतील. या परिषदेत सहभागी होण्यासाठी 50 हून अधिक देशांतील मोठ्या संख्येने भारतीयांनी नोंदणी केली आहे. यावेळी मोदी प्रवासी भारतीय एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील. ही अनिवासी भारतीयांसाठी खास पर्यटन ट्रेन असणार आहे, जी दिल्लीतील निजामुद्दीन रेल्वे स्थानकावरून निघेल आणि तीन आठवड्यांच्या कालावधीसाठी पर्यटन आणि धार्मिक महत्त्वाच्या ठिकाणी प्रवास करेल.