अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा पॅलेस्टिनी दहशतवादी गट हमासला 20 जानेवारीपूर्वी ओलिसांना सोडण्याचा इशारा दिला आहे. अन्यथा मध्य पूर्वेमध्ये सर्व काही नष्ट होईल अशीही थेट धमकी त्यांनी दिली आहे. ट्रम्प 20 जानेवारीला अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत.
नवनिर्वाचित अध्यक्ष ट्रम्प मंगळवारी फ्लोरिडा येथील मार-ए-लागो येथे पत्रकार परिषदेत अमेरिकन ओलिसांच्या सुटकेसंदर्भात हमासशी सुरू असलेल्या चर्चेच्या संदर्भात एका प्रश्नाचे उत्तर देत होते. हमासने ओलिस ठेवलेल्या नागरिकांच्या सुटकेबाबत कठोर भूमिका घेत ट्रम्प यांनी स्पष्टपणे सांगितले की, 20 जानेवारीला अमेरिकेच्या अध्यक्षपदी विराजमान होण्यापूर्वी ओलिसांची सुटका केली नाही तर ते हमासचे किंवा इतर कोणालाही सोडणार नाहीत.
कतारमधील ओलिसांच्या सुटकेबाबत इस्रायल आणि हमासच्या नेतृत्वात चर्चा सुरू आहे. याबाबत डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत की,
“मी कोणत्याही वाटाघाटींना हानी पोहोचवू इच्छित नाही, परंतु मी शपथ घेण्यापूर्वी ओलिसांच्या सुटकेवर करार केला नाही तर मध्य पूर्वमध्ये विनाश होईल. सर्व काही उद्ध्वस्त होईल. मला वेगळं काही सांगायची गरज नाही, पण त्यांनी ओलिसांना खूप आधी सोडायला हवे होते, नागरिकांना कधीच ओलीस ठेवता कामा नये”. तसेच ओलिसांच्या कुटुंबाकडून आपल्याला सुटकेसाठी फोन येत असल्याचे देखील ट्रम्प म्हणाले आहेत.
7 ऑक्टोबर 2023 रोजी दक्षिण इस्रायलवर हमासच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर, इस्रायलचा अंदाज आहे की हमासने अजूनही सुमारे शंभर लोकांना ओलीस ठेवले आहे,ज्यांच्या सुटकेसाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत.