आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध तिरुपती मंदिरात काल संध्याकाळी झालेल्या चेंगराचेंगरीत सहा जणांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे.तर ५० जखमी भाविकांवर तिरुपती येथील श्री वेंकटेश्वर रामनारायण रुईया सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिरुमला श्रीवारी वैकुंठ द्वार तिकीट काउंटरजवळील विष्णू निवासमजवळ ‘दर्शन’ टोकन वाटपाच्या वेळी ही घटना घडली. बुधवारी, काल संध्याकाळी १० जानेवारी ते १९ जानेवारी या कालावधीत वैकुंठ एकादशीनिमित्त उघडणाऱ्या “तिरुमाला वैकुंठ द्वार” च्या दर्शनासाठी टोकन मिळविण्यासाठी हे सर्वजण रांगेत उभे होते आणि दरम्यान, टोकनसाठी आलेल्या भाविकांच्या अनपेक्षित संख्येमुळे एक-दोन केंद्रांवर मोठी चेंगराचेंगरी झाल्यामुळे ही दुर्घटना घडली असल्याचे समोर आले आहे.
या घटनेवर दुःख व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हंटले आहे की, ‘आंध्र प्रदेशातील तिरुपती येथे झालेल्या चेंगराचेंगरीमुळे मी दुःखी आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्यासोबत माझ्या संवेदना आहेत. जखमींना लवकर बरे वाटावे यासाठी मी प्रार्थना करतो. आंध्र प्रदेश सरकार बाधित लोकांना सर्वतोपरी मदत करत आहे.
अपघातावर सतत लक्ष ठेवून असलेले आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. आज सकाळी ११:३० वाजता ते पीडितांच्या कुटुंबीयांना भेटणार आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले आणि चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांबद्दल संवेदना व्यक्त केली. जखमींच्या लवकर बरे होण्याची प्रार्थना करत त्यांनी म्हंटले आहे की ‘तिरुपती मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्दैवी घटनेने मी दुःखी आहे. मृतांच्या कुटुंबियांना माझ्या मनापासून संवेदना’.
तिरुपती वैकुंठ द्वारला भेट देण्याचे महत्त्व काय आहे?
जगप्रसिद्ध तिरुपती मंदिराच्या आतील गाभाऱ्याजवळ वैकुंठ द्वार आहे, जे वर्षातून फक्त एकदाच वैकुंठ एकादशीच्या शुभ मुहूर्तावर उघडले जाते. या शुभ दिवशी, भक्त वैकुंठद्वारातून प्रवेश करतात आणि प्रभूकडून विशेष आशीर्वाद घेतात. यासोबतच, लोक भगवान वेंकटेश्वराची प्रदक्षिणा करतात. असे मानले जाते की वैकुंठ द्वाराचे दर्शन केवळ सौभाग्यानेच मिळते. तसेच हा दुर्मिळ प्रसंग भक्तांना जन्म आणि मृत्युच्या चक्रातून मुक्तता प्रदान करतो असेही म्हंटले जाते. दरवर्षी या दहा दिवसांत मोक्षप्राप्तीच्या आशेने भगवान वेंकटेश्वराचे आशीर्वाद घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक मंदिरात येतात. यावेळी वैकुंठ एकादशीचा उत्सव १० जानेवारी रोजी आहे आणि या दिवशी दर्शनासाठी दरवाजे उघडले जातील. वैकुंठाचे दरवाजे १९ जानेवारीपर्यंत खुले राहतील.याच दर्शनाचा पास मिळवण्यासाठी काल भक्तांनी गर्दी केली होती.त्यावेळी ही दुर्घटना घडली आहे.