विधानसभेतील पराभवानंतर ठाण्यात चालू असलेली काँग्रेसमधली निलंबितांची मालिका सुरु असल्याचे दिसून आले आहे. नुकतेच काँग्रेसचे ठाणे शहर जिल्हा माजी अध्यक्ष अनिल साळवी यांना काँग्रेस पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी आघाडी धर्म न पाळता महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवाराचा जाहीर प्रचार करून शिस्तभंग केल्याप्रकरणी ही पक्षांतर्गत कारवाई करण्यात आली आहे, असे ठाणे शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अॅड. विक्रांत चव्हाण यांनी प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे.
या पत्रात त्यांनी पुढे म्हटले आहे की, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार न करता, महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) उमेदवार नजीब मुल्ला याचा जाहीर प्रचार केल्याचे निष्पन्न झालेले आहे. सबब काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणाच्या विरोधात, आपण आघाडी धर्म न पाळता पक्ष शिस्त भंग केल्यामुळे सहा वर्षांसाठी, आपणांस काँग्रेस पक्षातून पुढील आदेश येईपर्यंत निलंबित करण्यात येत आहे.