भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी बुधवारी(दि.8) दुबईत अफगाणिस्तानचे कार्यवाहक परराष्ट्र मंत्री मौलवी आमिर खान मुत्तकी यांच्याशी चर्चा केली. यावेळी राजकीय आणि आर्थिक संबंधांवर सखोल चर्चा करण्यात आली आहे . या बैठकीत, तालिबानने भारताचे आभार मानले आणि मानवतावादी मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली, तसेच भविष्यात सुरक्षा आणि व्यापार संबंधांमध्ये सहकार्य करण्याची इच्छा दर्शविली. भारताने अफगाणिस्तानसोबतचे संबंध दृढ करण्यासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
तालिबानचे परराष्ट्र मंत्री मौलवी अमीर खान मुत्तकी यांनी भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांच्या सोबत झालेल्या बैठकीत अफगाणिस्तानला दिलेल्या मानवतावादी मदतीबद्दल भारताचे आभार व्यक्त केले. तालिबानने भारताला एक महत्त्वपूर्ण आर्थिक देश मानले असून, भविष्यात भारताशी असलेले संबंध अधिक मजबूत करण्याची आवश्यकता व्यक्त केली.अफगाणिस्तानला मानवतावादी मदत करण्याच्या उद्देशाने व्यापार आणि व्यावसायिक क्रियाकलापांमध्ये सहकार्यासाठी चाबहार बंदराचा वापर करण्यास देखील सहमती दर्शविली गेली आहे. अफगाणिस्तानच्या विनंतीला प्रतिसाद म्हणून भारत पहिल्या टप्प्यात आरोग्य क्षेत्रात आणि निर्वासितांच्या पुनर्वसनासाठी आणखी मदत करेल. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, परराष्ट्र सचिवांनी अफगाण लोकांसोबतची भारताची ऐतिहासिक मैत्री आणि दोन्ही देशांमधील मजबूत संबंधांना अधोरेखित केले.
या बैठकीत, तालिबानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी भारताला सुरक्षा संबंधित आश्वासन दिले. अफगाणिस्तान कोणत्याही प्रकारचा धोका भारताला देणार नाही, अशी ग्वाही दिली आहे . विशेषतः अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्या सीमेवर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, तालिबानने या सुरक्षेचे आश्वासन देणे महत्त्वाचे मानले आहे.भारत आपल्या आंतरराष्ट्रीय धोरणांमध्ये अफगाणिस्तानशी असलेल्या संबंधांना प्राधान्य देत असल्याचे दोन्ही देशांमधील या भेटीतून सिद्ध झाले आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यांचा भारताने तीव्र निषेध व्यक्त केला होता. त्यानंतर आता भारताने अफगाणिस्तानला मानवतावादी आणि विकासात्मक मदत पुरवण्याचे जाहीर केले आहे.