आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिरातील चेंगराचेंगरी प्रकरणाबाबत आता चंद्राबाबू सरकारने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात निष्काळजीपणा केल्याबद्दल डीएसपी रमन कुमार आणि गोशाळेचे संचालक हरनाथ रेड्डी यांच्यासह तिघांना निलंबित करण्यात आले आहे. याशिवाय जिल्हा पोलिस अधीक्षक सुब्बारैडू, बालाजी मंदिराच्या सहाय्यक कार्यकारी अधिकारी गौतमी आणि सुरक्षा अधिकारी श्रीधर यांची तात्काळ बदली करण्यात आली आहे. बालाजी मंदिराच्या प्रशासन इमारतीत वैकुंठ द्वार दर्शन टोकन जारी करताना झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेचा आढावा घेतल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री चंद्राबाबू यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि कारवाईची माहिती दिली. आम्ही या घटनेची न्यायालयीन चौकशी करू.असेही ते यावेळी म्हणाले आहेत.
मुख्यमंत्री चंद्राबाबू म्हणाले की, आम्ही तिरुमला तिरुपती बालाजी मंदिर मंडळामार्फत प्रत्येक मृतांच्या कुटुंबाला प्रत्येकी २५ लाख रुपयांची आर्थिक मदत देणार आहोत. तसेच आम्ही मंदिर प्रशासनात मृताच्या कुटुंबातील एका सदस्याला कंत्राटी नोकरी देऊ. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, थिमक्का आणि ईश्वरम्मा या दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत आणि त्यांच्यावर मंदिर संचालित रुआ रुग्णालयात उपचार केले जातील. आम्ही त्यांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत करू.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, आम्ही ३३ जखमींना प्रत्येकी २ लाख रुपये भरपाई देऊ. अडचणींना तोंड देऊनही परमेश्वराला पाहण्याचा त्यांचा दृढ निश्चय असतो. त्यामुळे शुक्रवारी ३५ जखमींना वैकुंठ द्वारातून दर्शन घेता येईल याची सोय करू.
तिरुमला दिव्य क्षेत्राचे पावित्र्य राखण्याची जबाबदारी राज्य सरकार घेईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. आपल्या कृती जाणूनबुजून किंवा अजाणतेपणे देवाच्या पवित्रतेला दुखावत असतील तर ते चांगले नाही. आपल्या अक्षमतेमुळे देवाचे नाव कलंकित होऊ नये. इथे राजकारण नाही. आपण राजकारणाच्या पलीकडे जाऊन कलियुगाच्या देवाची सेवा करत आहोत या भावनेने पुढे गेले पाहिजे.असे त्यांनी नमूद केले.
चंद्राबाबूंनी स्पष्ट केले की पवित्र दिवसांमध्ये सुरळीत दर्शन सुनिश्चित करणे ही अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. तत्पूर्वी, मुख्यमंत्र्यांनी तिरुमला तिरुपती मंदिराच्या प्रशासकीय इमारतीतील परिस्थितीचा आढावा अध्यक्ष बी.आर. नायडू, कार्यकारी अधिकारी श्यामा राव, जिल्हाधिकारी वेंकटेश्वर, जिल्हा पोलिस अधीक्षक सुब्बारैडू आणि मंदिर प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत घेतला होता.