स्वातंत्र्यवीर सावरकर मानहानी प्रकरणात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना पुण्यातील विशेष न्यायालयाने २५,००० रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १८ फेब्रुवारी रोजी होणार आहे.
पुण्याच्या विशेष न्यायालयात काल होणाऱ्या सुनावणीसाठी राहुल गांधी उपस्थित राहणार होते पण परदेश दौऱ्यावर असल्याने राहुल गांधी आज न्यायालयात हजर राहिले नाहीत. राहुल गांधी यांचे वकील मिलिंद पवार यांनी न्यायालयाला सांगितले की, राहुल गांधी परदेश दौऱ्यावर आहेत, त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करावी. यानंतर, न्यायालयाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे खटल्याची सुनावणी केली, ज्यामध्ये राहुल गांधी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर झाले. यानंतर न्यायालयाने राहुल गांधींना २५,००० रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे .
काल न्यायालयात, ज्येष्ठ काँग्रेस नेते मोहन जोशी हे जामीनदार म्हणून न्यायालयात उभे राहिले होते. यानंतर वकील मिलिंद पवार यांनी या प्रकरणाची सुनावणी आता १८ फेब्रुवारी रोजी होणार असल्याचे सांगितले.
राहुल गांधी यांनी मार्च २०२३ मध्ये लंडनमध्ये भाषण देताना वीर सावरकरांबद्दल अपमानजनक विधान केले होते. या विधानाला अपमानास्पद म्हणत सात्यकी सावरकर यांनी पुणे न्यायालयात याचिका दाखल केली आहे.