बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी निर्घृण हत्या करण्यात आली. याप्रकरणी अटकेत असलेल्या सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, विष्णू चाटे, सिद्धार्थ सोनावणे आणि जयराम चाटे अशा ७ जणांवर मोक्का कायद्यांतर्गत खटला चालणार आहे. एसआयटीने हा मोक्का लावला असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.मात्र पोलिसांच्या ताब्यात असलेल्या वाल्मिक कराड या व्यक्तीला हत्येचा मास्टरमाइंड म्हटले जात आहे. तथापि, सध्या वाल्मिक कराड खंडणीच्या गुन्ह्यात अडकला आहे, मात्र त्याला संतोष देशमुख हत्या प्रकरणात अजून अटक झालेली नाही. म्हणून त्याच्यावर मोक्का लावला गेलेला नाही मात्र उर्वरित आरोपींवर मोक्का लावल्यामुळे आता त्यांना तुरुंगातून बाहेर पडणे कठीण होणार आहे.
मोक्का (महा संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा) हा एक कठोर कायदा आहे, जो खासकरून संघटित गुन्हेगारी रोखण्यासाठी बनवण्यात आला आहे. मोक्काच्या कलम 3 (1) अंतर्गत आरोपींना 5 वर्षांपासून जन्मठेपेपर्यंत शिक्षा होऊ शकते, आणि त्यांची मालमत्ता जप्त करण्याची तरतूद देखील आहे. या कायद्याचा मुख्य उद्देश असा आहे की गुन्हेगारी टोळ्या व त्यांच्या कारवायांचा नायनाट करण्यासाठी त्या टोळ्यांतील सदस्यांना गंभीर शिक्षा मिळावी.तसेच मोक्का कायदा लागू झाल्यानंतर पोलिसांना कोर्टामध्ये आरोपपत्र सादर करण्यासाठी पुरेसा अवधी मिळतो. पोलिसांना आरोपपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांचा वेळ मिळतो. शिवाय या गुन्ह्यामध्ये शक्यतो जामीन मिळत नाही. त्यामुळे आरोपी वर्षानुवर्षे तुरुंगात राहतात.