भारतीय युवकांवर आपला प्रचंड विश्वास असून या विश्वासातूनच माय भारतच्या निर्मितीला प्रेरणा दिली आणि विकसित भारत युवा नेते संवादाची पायाभरणी केली आहे. भारतातील तरुणांची क्षमता लवकरच भारताला विकसित राष्ट्र बनवेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे.विकसित राष्ट्र बनण्याचे ध्येय मोठे असले तरीही ते अशक्य नाही, असे सांगून नकार घंटा वाजवणाऱ्यांचे मत त्यांनी खोडून काढलेच पण त्याच बरोबर कोट्यवधी तरुणांच्या सामूहिक प्रयत्नांनी प्रगतीची चाके फिरली की राष्ट्र निश्चितपणे आपले लक्ष्य गाठेल, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय युवा दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे विकसित भारत युवा नेते संवाद 2025 या कार्यक्रमात भाग घेतला होता. या कार्यक्रमात भारतभरातील 3,000 उत्साही तरुणांनी सहभाग घेतला.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी भारतातील तरुणांच्या चैतन्यपूर्ण उर्जेने भारत मंडपममध्ये आणलेले सळसळते चैतन्य अधोरेखित केले. देशातील तरुणांवर अपार विश्वास असलेल्या स्वामी विवेकानंदांचे संपूर्ण देश स्मरण करत आहे आणि त्यांना आदरांजली वाहतो आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. स्वामी विवेकानंदांचा असा विश्वास होता की तरुण पिढीतून येणारे त्यांचे शिष्य, सिंहांप्रमाणे निधड्या छातीने प्रत्येक समस्येचा सामना करतील, असे त्यांनी सांगितले. ज्याप्रमाणे स्वामीजींनी तरुणांवर विश्वास ठेवला त्याचप्रमाणे स्वामीजींवर माझी पूर्ण स्वामीजींवर, विशेषत: तरुणांबद्दलच्या त्यांच्या दृष्टिकोनावर पूर्ण श्रद्धा आहे, असेही ते म्हणाले. आज जर स्वामी विवेकानंद आपल्यामध्ये असते तर 21 व्या शतकातील तरुणांची जागृत शक्ती आणि सक्रिय प्रयत्न पाहून ते नव्या आत्मविश्वासाने भारले असते, असेही पंतप्रधान म्हणाले आहेत.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, जी-20 कार्यक्रमात जगाच्या भविष्याबद्दल चर्चा करण्यासाठी अनेक जागतिक नेते एकाच ठिकाणी जमले होते, तर आज देशातील तरुण भारताच्या पुढील 25 वर्षांचा विकास आराखडा तयार करण्यासाठी एकत्र जमले आहेत. काही महिन्यांपूर्वी आपल्या निवासस्थानी तरुण खेळाडूंना भेटल्याचा एक किस्सा सांगताना पंतप्रधानांनी एका क्रीडापटूने “जगासाठी, तुम्ही कदाचित पंतप्रधान असाल, परंतु आमच्यासाठी तुम्ही परम मित्र आहात” असे म्हटल्याचे अधोरेखित केले. मैत्रीतील सर्वात मजबूत दुवा विश्वास आहे असे सांगून पंतप्रधानांनी भारतातील तरुणांसोबतच्या मैत्री संबंधावर भर दिला.
“इतिहास आपल्याला शिकवतो आणि प्रेरणा देतो”, असे मोदी म्हणाले आणि राष्ट्रे तसेच गटांनी, मोठी स्वप्ने आणि संकल्पांसह त्यांचे ध्येय साध्य केल्याची अनेक जागतिक उदाहरणे अधोरेखित केली. अमेरिकेतील 1930 च्या आर्थिक संकटाचे उदाहरण देताना त्यांनी सांगितले की अमेरिकी नागरिकांनी नवीन करार निवडला आणि केवळ संकटावर मात केली एव्हढेच नव्हे तर त्यांच्या विकासालाही गती दिली. त्यांनी सिंगापूरचाही उल्लेख केला, ज्याने जीवनातील मूलभूत संकटांचा सामना केला. मात्र, शिस्त आणि सामूहिक प्रयत्नांद्वारे त्यांचे जागतिक आर्थिक आणि व्यापार केंद्रात रूपांतरण झाले. भारताकडेही यासारखीच उदाहरणे असून स्वातंत्र्य लढा आणि स्वातंत्र्यानंतरच्या अन्न संकटावर मात केली याचा उल्लेख पंतप्रधानांनी केला. मोठी उद्दिष्टे निश्चित करणे आणि ती एका कालमर्यादेत साध्य करणे अशक्य नसल्याचे त्यांनी भर सांगितले. ध्येय स्पष्ट असल्याशिवाय काहीही साध्य होऊ शकत नाही आणि आजचा भारत याच मानसिकतेने काम करत आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
गेल्या दशकभरातील दृढनिश्चयाद्वारे उद्दिष्टे साध्य करण्याच्या अनेक उदाहरणांवर प्रकाश टाकत पंतप्रधानांनी सांगितले की भारताने खुल्याजागी शौचापासून मुक्ती मिळवण्याचा संकल्प केला आणि 60 महिन्यांत 60 कोटी नागरिकांनी हे लक्ष्य साध्य केले. भारतातील जवळपास प्रत्येक कुटुंबाला आता बँकिंग सेवा उपलब्ध आहेत आणि महिलांच्या स्वयंपाकघरांना धुरापासून मुक्त करण्यासाठी 100 दशलक्षाहून अधिक गॅस जोडण्या देण्यात आल्या आहेत यावर पंतप्रधानांनी भर दिला. विविध क्षेत्रांमध्ये भारत आपले लक्ष्य निर्धारित वेळेपूर्वीच साध्य करत असल्याचे नमूद करून मोदी म्हणाले की, कोविड-19 महामारीच्या काळात, जग लसींसाठी संघर्ष करत असताना, भारतीय शास्त्रज्ञांनी वेळेआधीच लस विकसित केली. भारतातील प्रत्येकाचे लसीकरण करण्यासाठी 3-4 वर्षे लागतील असे भाकीत असतानाही, देशाने विक्रमी वेळेत जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम राबवली असे ते पुढे म्हणाले. भारत हा नियत कालमर्यादेच्या नऊ वर्षे आधीच पॅरिस कराराच्या वचनबद्धतेची पूर्तता करणारा पहिला देश ठरला आहे अशी माहिती देत पंतप्रधानांनी हरित ऊर्जेबाबत भारताची वचनबद्धता अधोरेखित केली. पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिश्रित करण्याचे उद्दिष्ट 2030 पर्यंत असले तरी भारत अंतिम मुदतीपूर्वी ते पूर्ण करण्यासाठी सज्ज आहे असे त्यांनी नमूद केले. हे प्रत्येक यश प्रेरणादायी आहे आणि भारताला विकसित राष्ट्र बनण्याच्या ध्येयाच्या जवळ घेऊन जात आहे असे ते पुढे म्हणाले आहेत.
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडवीय, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय राज्य मंत्री जयंत चौधरी, रक्षा खडसे देखील इतर मान्यवरांसमवेत कार्यक्रमाला उपस्थित होते.