वाल्मिक कराडवर आज अखेर मकोका (Mcoca) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात त्याचा ताबा मिळवण्यासाठी सीआयडीने कोर्टासमोर अर्ज दाखल केला आहे.
वाल्मिक कराड याला मकोका लागल्यानंतर समर्थक आक्रमक झाले. त्यांनी सकाळपासूनच तीव्र आंदोलन करत परळी बंदची हाक दिली आहे. आज वाल्मिक कराड यांच्या आईने सुद्धा पोलीस ठाण्याबाहेर त्यांना सोडावे यासाठी ठिय्या आंदोलन केले. शहरातील विविध दुकानं आणि आस्थापनं बंद करण्यात आली आहे. परळीचे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत.
सरपंच संतोष देशमुख्य यांच्या हत्येप्रकरणात वाल्मिक कराडवर हत्येच्या कटात सहभागी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांसह, गावकऱ्यांचीही वाल्मिक कराडवर मकोका लावण्याची मागणी होती. खंडणी आणि हत्या हे दोन्ही प्रकरण संलग्न असल्याने त्याच्यावर मकोकाखाली गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आणि सर्वपक्षीय नेत्यांनी केली होती. अशातच आता वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आला आहे.
दरम्यान, सीआयडीच्या पथकाने बीड शहर पोलीस ठाण्यातच वाल्मिक कराड याच्या आवाजाचे नमुने गोळा केले. खंडणी प्रकरणाच्या तपासात हा अत्यंत महत्त्वाचा पुरावा ठरणार आहे. वाल्मिक कराड याने पवनचक्की निर्मिती करणाऱ्या आवादा कंपनीकडून 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे.