भारतीय सैन्याच्या समृद्ध इतिहास आणि लष्करी वारशासाठी प्रसिद्ध असलेल्या पुण्यामध्ये या वर्षी प्रथमच आज १५ जानेवारी २०२५ रोजी आर्मी डे परेडचे आयोजन करण्यात आले आहे. १९४९ मध्ये स्वतंत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख म्हणून फील्ड मार्शल के एम करिअप्पा यांची नियुक्ती झाल्याबद्दल आर्मी डे परेड समर्पित आहे. स्वातंत्र्यानंतर भारतीय सैन्याच्या नेतृत्व क्षमतेचे आणि अभिमानाचे प्रतीक म्हणून ह्या परेडकडे पहिले जाते.
याआधी आर्मी डे परेड दिल्लीत आयोजित केली जात होती, परंतु मोदी सरकारच्या निर्णयानंतर २०२३ पासून वेगवेगळ्या शहरांमध्ये ती आयोजित करण्याची परंपरा सुरू झाली. २०२३ मध्ये बेंगळुरू आणि २०२४ मध्ये लखनऊनंतर आता २०२५ साठी पुण्याची निवड झाली आहे. ही निवड पुण्याच्या लष्करी वारशाचे आणि भारतीय सैन्याच्या दक्षिण कमांड मुख्यालयाच्या भूमिकेचे प्रतिबिंब ठरणार आहे.
मुख्य आकर्षणे कोणती असतील?
आर्मी डे कार्यक्रमाचे वेळापत्रक आणि आकर्षणे देखील जाणून घेऊया. हा कार्यक्रम सकाळी ७ वाजता सुरू होईल आणि ११ वाजेपर्यंत चालेल. या वर्षीची परेड बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप अँड सेंटर येथे आयोजित केली जाईल. यामध्ये, मार्चिंग तुकडी, आधुनिक लष्करी वाहने आणि संरक्षण तंत्रज्ञानाचे प्रदर्शन केले जाईल. परेडच्या मुख्य आकर्षणांमध्ये ड्रोन आणि रोबोटिक्ससारख्या प्रगत तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक, लढाऊ कौशल्ये आणि मार्शल आर्ट्सचे रोमांचक प्रात्यक्षिक यांचा समावेश असेल.या परेडमध्ये संरक्षणमंत्री राजनाथ सिंग आणि लष्करप्रमुख उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. या परेडमध्ये महिला अग्नीवीर कॉन्टिंगेंट, फायटर रोबोट्स तसेच एनसीसीच्या मुलीही सहभागी होणार आहेत.या वर्षी भारतीय सेना ‘मजबूत भारत, सक्षम सेना’ या टॅगलाइनच्या माध्यमातून आर्मी डे साजरा करणार आहे.
शहरातील नागरिकांसाठी अभिमानाची गोष्ट
आर्मी डे परेड हा केवळ एक औपचारिक कार्यक्रम नाही तर तो धैर्य, समर्पण आणि तांत्रिक प्रगतीचा राष्ट्रीय उत्सव आहे. वेगवेगळ्या शहरांमध्ये परेड आयोजित करण्याच्या उपक्रमाचा उद्देश स्थानिक समुदायांना सशस्त्र दलांशी जोडणे आणि त्यांच्याबद्दल जागरूकता वाढवणे आहे. विकेंद्रीकरणाच्या या प्रयत्नामुळे नागरिकांना लष्कराशी थेट संबंध जोडण्याची आणि त्यांचे योगदान जवळून पाहण्याची संधी मिळते. पुण्यात पहिल्यांदाच होणारी ही परेड शहरातील नागरिकांसाठी अभिमानाची बाब आहे आणि भारतीय सैन्याच्या गौरवशाली इतिहासाला अभिवादन करण्याची संधी देते.