पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईतील माझगांव डॉक येथे ‘आयएनएस सूरत’, ‘आयएनएस निलगिरी’ या युद्धनौकांचे आणि ‘आयएनएस वाघशीर’ या पाणबुडीचे राष्ट्रार्पण करण्यात आले. यावेळी केंद्रीय संरक्षणमंत्री राजानाथ सिंह, महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह नौदलाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांशी संवादही साधला.
पंतप्रधान म्हणाले की, आजचा दिवस भारताच्या सागरी वारशासाठी, नौदलाच्या गौरवशाली इतिहासासाठी आणि आत्मनिर्भर भारत मोहिमेसाठी एक मोठा दिवस आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी नौदलाला नवीन शक्ती आणि दूरदृष्टी दिली आहे.आज, या पवित्र भूमीवर, आणि सेना दिन साजरा करत असताना आपण २१ व्या शतकातील नौदलाला बळकट करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलत आहोत.
ते म्हणाले की, पहिल्यांदाच एक विनाशिका, एक फ्रिगेट आणि एक पाणबुडी एकत्रितपणे कार्यान्वित होत आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हे आघाडीचे प्लॅटफॉर्म भारतात बनवलेले उत्पादने आहेत. हे तिघे भारताच्या सुरक्षिततेला आणि प्रगतीला नवीन बळ देतील. यावेळी पंतप्रधान मोदींनी याबद्दल भारतीय नौदल, अभियंते, कामगार आणि संपूर्ण देशाचे अभिनंदन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आज भारताला जगभरात आणि विशेषतः जागतिक दक्षिणेत एक विश्वासार्ह आणि जबाबदार भागीदार म्हणून ओळखले जात आहे. ते म्हणाले की, भारताने नेहमीच खुल्या, सुरक्षित, समावेशक आणि समृद्ध इंडो-पॅसिफिक प्रदेशाचे समर्थन केले आहे. २१ व्या शतकातील भारताची लष्करी क्षमता अधिक सक्षम आणि आधुनिक असावी ही देशाची प्राथमिकता आहे, असे ते म्हणाले. भारत आपले हितसंबंध सर्वत्र सुरक्षित करत आहे आज भारत संपूर्ण जगाला आणि ग्लोबल साऊथमध्ये आश्वासक आणि जबाबदार साथीदार म्हणून पाहिला जात आहे. भारत विस्तारवादाच्या भूमिकेतून नव्हे तर विकासाच्या भूमिकेतून काम करत असल्याचे मोदींनी नमूद केले आहे.
दोन युद्धनौका व एका पाणबुडीचे एकाचवेळी जलावतरण होणे, ही भारताच्या संरक्षण क्षमतेच्या दृष्टीने महत्त्वाची बाब आहे. ‘आयएनएस’ सूरत ही सर्वांत मोठी आणि अत्याधुनिक विनाशिका आहे. ही क्षेपणास्त्रवाहू (पी१५बी गाईडेड मिसाईल) प्रकल्पातील चौथी आणि शेवटची विनाशिका आहे. यामध्ये ७५ टक्के तंत्रज्ञान स्वदेशी आहे. ‘आयएनएस निलगिरी’ ही (पी१७ए स्टेल्थ फ्रिगेट) या अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रकल्पातील पहिली युद्धनौका आहे. ‘आयएनएस वाघशीर’ ही (पी७५ स्कॉर्पियन) प्रकल्पातील सहावी पाणबुडी असून फ्रान्सच्या सहकार्यातून ती बनविण्यात आली आहे.