इस्रायल आणि हमास यांच्यात गाझामध्ये गेल्या 15 महिन्यांपासून सुरू असलेले युद्ध रविवारी, 19 जानेवारीला थांबणार आहे. यासाठी दोन्हीमध्ये युद्धविराम आणि ओलीसांची सुटका यासंबंधीचे करार निश्चित करण्यात आले आहेत. कतारचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन अब्दुल रहमान बिन जस्सिम अल थानी यांनी ही माहिती दिली आहे.
कतारची राजधानी दोहा येथे गेल्या अनेक आठवड्यांपासून युद्धबंदीसाठी वाटाघाटी सुरू होत्या. या संभाषणात इजिप्त आणि अमेरिकाही सामील होते. या करारानुसार हमास आपल्या कैदेत असलेल्या इस्रायली ओलीसांची सुटका करणार आहे तसेच त्या बदल्यात इस्रायल हमासच्या लोकांनाही सोडणार आहे.
युएनचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी या युद्धबंदीच्या निर्णयाचे स्वागत करत म्हटले की, “गाझामध्ये युद्धविराम आणि ओलिसांची सुटका सुनिश्चित करण्यासाठी कराराच्या घोषणेचे मी स्वागत करतो.” तसेच त्यांनी इजिप्त, कतार आणि अमेरिका या करारामध्ये मध्यस्थी करणाऱ्या देशांच्या प्रयत्नांचेही कौतुक केले आहे.
भारताने इस्रायल आणि हमास यांच्यात नुकत्याच घोषित केलेल्या युद्धविराम आणि ओलिसांच्या सुटकेच्या कराराला पाठिंबा दर्शवत या निर्णयाचे स्वागत केले आहे. तसेच परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) आशा व्यक्त केली की या करारामुळे गाझामधील मानवतावादी परिस्थितीत सुधारणा होईल आणि मदतीचा पुरवठा होईल असे परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हमासने 19 वर्षाखालील महिला आणि तरुण ओलीसांची सुटका करण्यास सहमती दर्शवली आहे. यानुसार, इस्रायल गाझामधून टप्प्याटप्प्याने सैन्य मागे घेणार आहे. कराराचा पहिला टप्पा 42 दिवसांचा असेल, ज्यामध्ये सुमारे 34 ओलिसांची सुटका केली जाईल.
इस्रायल-हमास युद्ध थांबवण्यासाठी झालेला हा करार आशेचा किरण आहे. ओलीसांची सुटका आणि युद्धबंदी यामुळे दोन्ही देशांमधील तणाव कमी होण्याची शक्यता आहे. तसेच विशेष करून गाझामधील सामान्य नागरिकांसाठी हा निर्णय दिलासादायक ठरणार आहे.