राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेचा पुढील हप्ता 26 जानेवारीपर्यंत देण्यात येणार आहे अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली. काल मंत्रालयात मंत्रीपरिषद बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे .
तटकरे म्हणाल्या की, राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिला लाभार्थ्यांना जुलै महिन्यापासून लाभ वितरीत करण्यास सुरुवात केली. त्यानुसार योजनेचा पुढील हप्ता 26 जानेवारीपर्यंत थेट लाभ हस्तंतरणाद्वरे (डी बी टी द्वारे) पात्र महिला लाभार्थ्यांना हस्तांतरित करण्यात येणार आहे. यासाठी ३ हजार ६९० कोटी इतक्या रकमेला मंजुरी देण्यात आली आहे.
जानेवारी महिन्याच्या लाभाच्या वितरणाची सुरुवात 26 जानेवारीच्या आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार करणार आहोत, असे आदिती तटकरे म्हणाल्या आहेत. 2100 रुपयांच्या निर्णयाबाबत नव्या अर्थसंकल्पात किंवा त्यानंतरच्या काळात विचार केला जाईल, असे त्यांनी सांगितले आहे.जास्तीत जास्त महिलांपर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ पोहोचवणे असा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
अर्थ विभागाकडून 3690 कोटी रुपयांचा निधी जानेवारी महिन्याच्या वितरणासाठी मिळालेला आहे. फेब्रुवारीसंदर्भात देखील नियोजन सुरु आहे. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर त्यावेळेला सुद्धा प्रत्येक महिन्यात कुठेही खंड पडणार नाही यासाठी आम्ही काम करत आहोत, असे तटकरे म्हणाल्या आहेत. तसेच डिसेंबर महिन्यात 2 कोटी 47 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.