पॅरिस ऑलिंपिकमध्ये भारतासाठी दोन पदके जिंकणारी भारतीय नेमबाज मनू भाकर आणि जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद विजेती डी. गुकेश यांच्यासह चार भारतीय खेळाडूंना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रपती भवनात या खेळाडूंना पुरस्कार प्रदान केले. मनु भाकर, डी. गुकेश, पुरुष हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि पॅरा अॅथलीट प्रवीण कुमार यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यावेळी क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय आणि इतर केंद्रीय मंत्रीही तिथे उपस्थित होते.
क्रीडा क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी केल्याबद्दल या चारही खेळाडूंना खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मनू भाकर हिने ऑलिंपिक खेळांच्या एकाच आवृत्तीत दोन पदके जिंकून भारताचा सन्मान वाढवला. तसेच गुकेश डी हा सर्वात तरुण बुद्धिबळ विश्वविजेता बनला. हॉकी कर्णधार हरमनप्रीतने टोकियो ऑलिंपिक आणि पॅरिस ऑलिंपिकमध्ये भारताला दोन कांस्यपदके जिंकून दिली होती, तर प्रवीणने टोकियो गेम्स आणि पॅरिस गेम्समध्ये अनुक्रमे रौप्य आणि सुवर्णपदक जिंकले होते.
३४ खेळाडूंना अर्जुन पुरस्कार प्रदान
खेलरत्न व्यतिरिक्त, क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी इतर ३४ खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पॅरा स्विमर मुरलीकांत राजाराम पेटकर,अॅथलीट सुचा सिंग यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. याशिवाय, ५ प्रशिक्षकांना प्रशिक्षणासाठी द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.