प्रयागराजमध्ये यावर्षी 13 जानेवारीपासून कुंभमेळ्याला सुरुवात झाली आहे. हा मेळा 26 फेब्रुवारीपर्यंत सुरु राहणार आहे. पहिल्या 3 दिवसात साधारण 6 कोटी भाविकांनी संगमात स्नान केल्याची माहिती समोर आली आहे.
महाकुंभाच्या पांचव्या दिवशी आज, शुक्रवारी भक्तांचा अखंड ओघ सुरूच आहे. तर अनेक भाविकांनी संत महंतांच्या तंबुत जाऊन त्यांचे आशिर्वाद घेतले आणि कथांचे श्रवण केले आहे. महाकुंभ मध्ये भक्त तसेच विदेशी भक्त,प्रवासी मोठ्या संख्येने हजेरी लावत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या गर्दीला सनातन धर्मा प्रती लोकांची दृढ श्रद्धेचे प्रतिक असल्याचे म्हंटले आहे. भारतासोबतच जगभरातून मोठ्या संख्येने भाविक महाकुंभात सहभागी होत आहेत.
भक्तांसाठी महाकुंभात उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली आहे. भक्त इथल्या जेवणाच्या व्यवस्थेवरून देखील खूप समाधानी आहेत. सुरभी शोध संस्थान या समाजसेवी संस्थेकडून भक्तांसाठी फक्त नाश्त्याची व्यवस्था केलेली नाही तर त्यांच्या सेवेत अनेक कार्ये केली जात आहेत. त्यामुळे भाविकांमध्ये समाधानाचे आणि आनंदाचे वातावरण आहे. कारण अशा प्रकारे शुद्ध आणि सात्विक अन्नासाठी कोणालाही धावपळ करावी लागत नाही.
मौनी अमावस्येनिमित्त जास्तीत जास्त भाविकांनी स्नान करावे यासाठी योगी सरकार पूर्ण तयारी करत आहे. मौनी अमावस्येच्या स्नानादरम्यान 6 कोटींहून अधिक भाविकांच्या गर्दीला तोंड देण्यासाठी रेल्वेने विशेष व्यवस्था केली आहे. रेल्वेने केलेल्या अतिरिक्त व्यवस्थेमुळे भाविकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही.
संत अनिरुद्धाचार्य महाराज म्हणाले आहेत की, संपूर्ण देश महाकुंभाचा पवित्र सण साजरा करत आहे. मुख्यमंत्री योगींनी अवघ्या 4 महिन्यात महाकुंभ नगरची स्थापना केली आहे. तेथे भाविकांसाठी सर्व व्यवस्था करण्यात आली होती. शहर वसवणे ही साधी गोष्ट नाही. संपूर्ण जत्रा परिसरात कोणत्याही व्यवस्थेत कमतरता नाही.
कुंभमेळ्याच्या 45 दिवसांमध्ये साधारण 45 कोटी भाविक येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ही आकडेवारी जाहीर केली होती.यावेळी कुंभमेळ्यातील भाविकांची संख्या मोजण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत घेतली जात आहे. तसेच या मेळ्यात 200 जागांवर सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आले आहेत.