भारताकडून सीमेवर लावण्यात येणाऱ्या कुंपणाला बांगलादेशचे अंतरिम सरकार अडथळा आणते आहे. यापार्श्वभूमीवर भारताने आज, शुक्रवारी स्पष्ट केले की, भारताला बांगलादेशशी सकारात्मक संबंध हवेत. परंतु, सीमा गुन्हेगारीमुक्त असावी ही भारताची वचनबद्धता आहे आणि कायम राहील.
सीमेवर कुंपण घालण्याबाबत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, यापूर्वीचे परस्पर संबंध लक्षात घेऊन बांगलादेश सहकार्याची भूमिका घेईल. आम्ही कार्यवाहक आणि उपकार्यवाहक उच्चायुक्तांना बोलावून सीमेवर कुंपण घालण्याबाबत आमची भूमिका स्पष्ट केली होती. सीमेवर गुन्हेगारी कारवाया, तस्करी आणि मानवी तस्करी रोखण्यासाठी प्रकाश व्यवस्था, तांत्रिक उपकरणे बसवणे आणि कुंपण घालण्यासाठी भारत कटिबद्ध आहे. कुंपण घालण्याचा उद्देश सीमा सुरक्षित करणे हा आहे. या गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी बांगलादेश सहकार्याचा दृष्टिकोन स्वीकारेल अशी आशा असल्याचे जयस्वाल म्हणाले आहेत.
भारत-बांगलादेश संबंधांबाबत आमची भूमिका अनेकदा स्पष्ट केली आहे. आमच्या परराष्ट्र सचिवांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या प्रमुखांशी झालेल्या बैठकीत सांगितले होते की आम्हाला सकारात्मक संबंध हवे आहेत. भारत-बांगलादेश संबंध दोन्ही देशांच्या लोकांसाठी चांगले असावेत, अशी आमची इच्छा आहे. त्यामुळे आमचा दृष्टिकोन सकारात्मक आहे आणि तसाच राहील असे जयस्वाल म्हणाले आहेत. .
गेल्या आठवड्यात बांगलादेशचे भारतातील कार्यकारी उच्चायुक्त मोहम्मद नूरल इस्लाम यांना परराष्ट्र मंत्रालयाने बोलावले होते. भारताने बांगलादेशच्या राजदूतांना सांगितले की, भारताने सीमेवरील सुरक्षा उपायांबाबत सर्व प्रोटोकॉल आणि करारांचे पालन केले आहे. मात्र यात कुंपण घालण्याचाही समावेश आहे. बांगलादेशच्या उपउच्चायुक्तांना समन्स बजावण्याच्या एक दिवस आधी बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने ढाकास्थित भारतीय उच्चायुक्त प्रणय वर्मा यांना समन्स बजावले होते. यादरम्यान बांगलादेशने भारत-बांगलादेश सीमेवर नुकत्याच करण्यात आलेल्या कुंपणावर आक्षेप घेतला होता.