छत्तीसगड मधल्या नक्षलग्रस्त गरियाबंद जिल्ह्यातील मैनपूर पोलीस स्टेशन परिसरातील कुल्हाडी घाटात असलेल्या भालू दिग्गी जंगलात रविवारी सकाळपासून सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत आतापर्यंत १४ नक्षलवादी ठार झाले आहेत. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात स्फोटके, एसएलआर आणि आयडी जप्त करण्यात आले आहेत.सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. एसपी राखेचा यांनी आज याची पुष्टी केली आहे. या ऑपरेशनमध्ये 1 कोटींच्या बक्षीस असलेला नक्षलवादी जयराम उर्फ चलपती ठार झाल्याची माहिती मिळाली आहे.तसेच मृत नक्षलवाद्यांमध्ये माओवादी गटाचे वरिष्ठ कॅडर सामील आहेत. ज्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
काल झालेल्या चकमकीत दोन महिला नक्षलवादी ठार झाल्या आहेत. ही चकमक छत्तीसगड-ओडिशा सीमेवर सुरू आहे. तर काल सोमवारी रात्री उशिरा आणि मंगळवारी सकाळी झालेल्या गोळीबारात आणखी बारा माओवादी ठार झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ जानेवारीच्या रात्री ओडिशाच्या नुआपाडा जिल्ह्याच्या सीमेपासून फक्त पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या छत्तीसगडच्या कुलारीघाट राखीव जंगलात ६० माओवादी असल्याची गुप्त माहिती मिळाली होती.यानंतर गरियाबंद पोलिसांनी विशेष शोध मोहीम सुरू केली होती आणि जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल राखेचा यांनी यावर लक्ष ठेवले होते.
राखेजा यांच्या मते, गरियाबंद कोब्रा बटालियनचा एक सैनिक जखमी झाला आहे. त्याला विमानाने रायपूरला पाठवण्यात आले आहे. जखमी सैनिकाची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. चकमकीदरम्यान, सुरक्षा दलांनी शस्त्रे देखील जप्त केली आहे, ज्यामध्ये एसएलआर रायफल्स सारखी स्वयंचलित शस्त्रे समाविष्ट होती. या नक्षलविरोधी शोध मोहिमेत गरियाबंद ऑपरेशन ग्रुप E30, कोब्रा 207, CRPF ची 65 आणि 211 बटालियन आणि SOG नुआपाडा यांचे संयुक्त पथक समाविष्ट आहे.
2024 मध्ये बस्तर विभागात नक्षलवाद्यांविरुद्ध सुरक्षा दलांची मोहीम मोठ्या प्रमाणात यशस्वी झाली आहे. विजापूर आणि सुकमा येथे झालेल्या अनेक कारवायांमध्ये 50 हून अधिक नक्षलवादी ठार करण्यात सुरक्षा जवानांना यश मिळाले आहे. तसेच अनेक नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आणि अनेकांनी आत्मसमर्पण केले आहे. ही कारवाई सुरक्षा दलांच्या नक्षलवाद्यांविरुद्धच्या सततच्या सक्रिय आणि कठोर कारवाईचा एक भाग आहे, जी परिसरात शांतता आणि सुरक्षा स्थापित करण्यासाठी केली जात आहे.