मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचा मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराडला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.आवादा कंपनीच्या खंडणी प्रकरणात आणि देशमुख हत्या प्रकरण अश्या दोन्हीसाठी मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झालेल्या वाल्मिक कराड याला बीडच्या विशेष मकोका न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. आमच्याकडून तपास पूर्ण झाला आहे, असे गुन्हे अन्वेषण विभागाने न्यायालयाला सांगितले आहे.
बीडच्या मोका विशेष न्यायालयात बुधवारी साडेअकरा वाजता वाल्मिक कराड याच्या सुनावणीला सुरुवात झाली. सुरक्षेच्या कारणास्तव वाल्मिक कराड याला दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हिडीओ कॉन्फरन्सिंग) हजर करण्यात आले होते.
न्यायालयीन कोठडी मिळाल्यानवर आरोपीली जामीनासाठी अर्ज केला जातो. त्यामुळे कराडकडून जामीनासाठी अर्ज केला जाऊ शकतो. मात्र मकोका लागला असल्याने त्याला जामीन मिळणे अवघड आहे. मागील सुनावणीवेळी कराडने कोठडी मागितली होती. सध्या बीड पोलीस स्टेशनच्या लॉकअपमध्ये असणाऱ्या कराडची बीड जिल्हा कारागृहात रवानगी होण्याची शक्यता आहे.
वाल्मिक कराड याचा बुधवारी एक व्हिडीओ समोर आला होता. ज्यामध्ये वाल्मिक कराड हा खंडणी मागितली त्या दिवशी विष्णू चाटे याच्या ऑफिसमध्ये जात आहे असे दिसून आले. यावेळी कराडसोबत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, प्रतिक घुले दिसत आहे. त्यासोबतच पोलीस निरीक्षक राजेश पाटीलसुद्धा उपस्थित होते.