पुण्यात गुइलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) नावाच्या दुर्मिळ आजाराचे २४ संशयित रुग्ण आढळून आले आहेत.हे सर्व रुग्ण मुख्यत्वे करून सिंहगड रोड ,धायरी इत्यादी परिसरातील आहेत.शहरात पसरलेल्या या दुर्मिळ आजाराच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी पुणे महानगरपालिका व स्वयंसेवी संस्था (PATH) यांच्या सहभागाने शीघ्रकृती दलाची स्थापना करण्यात आली आहे.
‘गुलेन बॅरी सिंड्रोम’ या (Guillain-Barre Syndrome) न्यूरोलॉजिकल आजाराचे पुणे महानगरपालिका हद्दीतील 6 खासगी रुग्णालयांमध्ये 24 संशयित रुग्ण आढळून आल्याची माहिती आहे. त्यापैकी 8 रुग्णांवरती अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत. तर त्यापैकी 2 रुग्ण व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
डॉक्टरांनी सांगितल्यानुसार, गुइलेन-बॅरे सिंड्रोम हा दुर्मिळ आजार असून हा आजार झालेल्यांना रुग्णांना कमकुवतपणा जाणवू लागतो. याशिवाय हा आजार मज्जासंस्थेशी संबंधित असून रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती स्वतःच्या मज्जासंस्थेवर हल्ला करते. ज्यामुळे हात पाय सुन्न होणे, हातापायांची हालचाल थांबणे, स्नायू कमकुवत होणे इत्यादी गंभीर लक्षणे दिसून आली आहेत. हा आजार झालेल्या रुग्णांची स्थिती गंभीर असून त्यांना चालणे किंवा श्वास घेण्यास अनेक अडचणी येत आहेत.
गुइलेन-बॅरे सिंड्रोमची लक्षणे खालीलप्रमाणे आहेत.
अचानक शरीरात सुन्नपणा जाणवणे
डोळे आणि स्नायूंमध्ये अडचण
बोलण्यात, चघळण्यात किंवा गिळण्यात समस्या
सुई टोचल्यासारख्या वेदना होणे
समन्वयाची समस्या, चालण्यात अस्थिरता
हृदयाची गती किंवा रक्तदाब मध्ये बदल
पचन किंवा मूत्राशय नियंत्रणात समस्या
दूषित पाण्यातून या आजाराचा प्रदुर्भाव होण्याची शक्यता तज्ञांकडून वर्तवली जात आहे.तसेच हा आजार होण्याचे विविध कारण असल्याची सांगितले जात आहे. जसे की बॅक्टेरिअर इन्फेक्शन, व्हायरल इन्फेक्शन, रोगप्रतिकारशक्ती कमी होणे इत्यादी गोष्टी याला कारणीभूत ठरण्याची शक्यता असते.त्यामुळे या सगळ्या शक्यतांच्या तपासणीसाठी तज्ञ समिती नेमण्याचा निर्णय पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने घेतला आहे.