जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील परधाडे रेल्वे स्थानकाजवळ बुधवारी संध्याकाळी पुष्पक एक्स्प्रेसला आग लागण्याच्या अफवेमुळे प्रवाशांनी रेल्वेतून उड्या मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आपला जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी चालत्या रेल्वेतून उड्या मारल्या होत्या. मात्र त्याचवेळी भुसावळकडे जाणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसने यातील अनेकांना चिरडले. यात आतापर्यंत 13 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 25 जखमी झाले असल्याची बातमी समोर आली आहे. जखमींवर जळगाव आणि पाचोरा येथील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर आता मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जळगाववरुन मुंबईकडे येणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसचा अचानक ब्रेक लागल्याने आगीच्या ठिणग्या उडाल्या. .रेल्वेच्या रसोईतील चहा विक्रेत्याने आग लागली, आग लागली अशी ओरड केली. त्यावेळी डब्यात आगीची चर्चा सुरू झाली आणि अचानक गोंधळ उडाला.आणि प्रवाशांनी जिवाच्या भीतीने ट्रेनची चेन ओढली आणि ट्रेन थांबताच खाली उड्या मारल्या असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे.
जखमींना जळगावच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.जळगाव रेल्वे अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १.५ लाख रुपये, गंभीर जखमींना ५०,००० रुपये आणि किरकोळ जखमींना ५,००० रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे,” असे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या कार्यालयाने एका निवेदनात म्हटले आहे.
जळगावचे जिल्हा दंडाधिकारी (डीएम) आयुष प्रसाद यांनी एएनआयला सांगितले की, “आम्हाला अपघाताची माहिती मिळाल्यानंतर प्रशासनाने तातडीने कारवाई केली आणि घटनास्थळी रुग्णवाहिका आणि इतर मदत पाठवली. रुग्णालये सक्रिय करण्यात आली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मृतांचे शवविच्छेदन केले जात आहे. सर्व तपास सुरू आहे.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुःखद रेल्वे अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे, “महाराष्ट्रातील जळगाव येथे रेल्वे रुळांवर झालेल्या दुःखद अपघाताने मी दुःखी आहे. मी शोकग्रस्त कुटुंबांना मनापासून संवेदना व्यक्त करतो आणि सर्व जखमींच्या जलद पुनर्प्राप्तीसाठी प्रार्थना करतो. अधिकारी बाधितांना सर्वतोपरी मदत करत आहेत,” असे पंतप्रधान कार्यालयाने X वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी जळगाव रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली. जखमींचा सर्व वैद्यकीय खर्चही राज्य सरकार करेल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे.