सैफ अली खानवर हल्ल्याचे प्रकरण ताजे असतानाच बॉलीवूडमधून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बॉलिवूडमधील चार कलाकारांना धमकीचे मेल आले आहेत. कॉमेडीयन कपिल शर्मा, सुगंधा मिश्रा, कोरिओग्राफर रेमो डिसोझा आणि राजपाल यादव या चार कलाकारांना हे धमकीचे मेल आले आहेत.याप्रकरणी पोलिसांनी तक्रार नोंदवली आहे.
सुप्रसिद्ध अभिनेता राजपाल यादव, कॉमेडियन कपिल शर्मा, सुगंधा मिश्रा, रेमो डिसूझा यांना हा धमकीचा मेल आला आहे. या मेलमध्ये लिहिण्यात आले आहे की, “आम्ही हा मेल पाठवून कोणताही पब्लिसिटी स्टंट करत नाही आहोत. तुमच्या दैनंदिन जीवनाबद्दल आमच्याकडे सर्व माहिती आहे. पुढील ८ तासांमध्ये तुम्ही तुमची प्रतिक्रिया द्याल याची मी आशा करतो. जर तुम्ही काही उत्तर दिले नाही तर तुम्ही आम्हाला गांभीर्याने घेतलं नाही असं आम्ही गृहित धरु.”
मीडिया रिपोर्ट्सनुसार विष्णु नावाच्या एका व्यक्तीने हा ईमेल पाठवला आहे. धमकीचा हा मेल थेट पाकिस्तानवरून पाठवण्यात आला आहे. जर पुढील आठ तासात या कलाकारांनी या धमकीला काही उत्तर दिलं नाही तर पुढे आम्ही योग्य ती कारवाई करु, अशा शब्दात हा मेल आला आहे.त्यामुळे आता या प्रकरणी पोलिसांनी तक्रार नोंदवली असून याच्या आयपी-ऍड्रेसचा छडा लावून धमकी पाठवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.
यामध्ये कपील शर्माला त्याच्या कुटुंबीयांना, सहकाऱ्यांना तसेच शेजाऱ्यांनाही मारण्याची धमकी दिली आहे.या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. धमकी मिळताच अंबोली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 351(3) अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे. तर तक्रार दाखल होताच मुंबई पोलिसांनीही आपला तपास चालू केला आहे.