पुण्यात सध्या गुइलेन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) या आजाराने लोकांची चिंता वाढली आहे. या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसत आहे. आतापर्यंत एकूण ५९ लोकांना या आजाराचे निदान झाले आहे. तर यापैकी १२ जण व्हेंटिलेटरवर आहेत.
गुइलेन-बॅरे सिंड्रोम या आजारचे किरकिटवाडी, सिंहगड रस्ता आणि धायरी परिसरात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. या परिसरातील पाण्याचे नमुने महापालिकेकडून तपासले जात आहेत. गुइलेन-बॅरे सिंड्रोम हा दुर्मिळ आजार असला तरी नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी राज्य आणि नागरी आरोग्य अधिकाऱ्यांच्या बैठकीत परिस्थितीचा आढावा घेतला. यामध्ये रुग्णालयांनी जीबीएसची प्रकरणी पुणे महापालिकेकडे अहवाल दिला. ज्या भागामध्ये गुलियन बॅरी सिंड्रोम या आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत त्या भागातील पाण्याचे स्रोत महानगरपालिकेने तपासावेत असे पुलकुंडवार यांनी सांगितले.
राज्याच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, ५९ रुग्णांपैकी ३३ रुग्ण पुण्यातील ग्रामीण भागातील, ११ महापालिका हद्दीतील आणि १२ पिंपरी चिंचवड महापालिकेतील आहेत. तीन रुग्ण इतर जिल्ह्यातील आहेत. हा आजार कोणालाही होऊ शकतो. विशेषत: १२ ते ३० वयोगटांतील लोकांमध्ये याचे प्रमाण जास्त दिसून येते. काही वेळा वयस्कर व्यक्तींनाही लागण झाल्याचे आढळून आले आहे. मात्र, हा आजार धोकादायक नसल्याचे सांगितले जात आहे.